कोल्हापूर : कोरोनाच्या नियमांचे पालन करत चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत रविवारी येथील शाहू स्मारक भवन येथे छोट्या मुलांसाठी ‘एअरबड’ हा बालचित्रपट विनामूल्य दाखवण्यात आला. कोरोनामुळे वर्षभरानंतर मुलांनी शाहू स्मारक भवनात प्रवेश केला.
मुलांनी सिनेमापासून चांगले घ्यावे, त्यातील वेगवेगळ्या पात्रांचा अभ्यास करावा, यातून कोवळ्या वयात काही शिकायला मिळेल, या संस्काराची गरज आहे, असे आवाहन अभिनेता, प्रेरणादायी वक्ते देवेंद्र चौगुले यांनी यावेळी केले.
मिलिंद कोपर्डेकर यांनी ‘शिनेमा पोरांचा’ हे पुस्तक देऊन त्यांचे स्वागत केले. लॉकडाऊनमध्ये चिल्लर पार्टीने केलेल्या कामाची माहिती मिलिंद यादव यांनी सांगितली. यावेळी हेल्पर्स, खेळघर, अवनि आणि सुधाकर जोशी नगरातील कार्यकर्त्यांचे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. चित्रपटानंतर सर्व मुलांना खाऊ देण्यात आला. हेल्पर्स ऑफ हँडिकॅप्ड, अवनी, खेळघर, सुधाकर जोशीनगरमधील मुलांसह सुमारे दोनशे छोट्या दोस्तांनी या चित्रपटांचा आनंद घेतला. यावेळी चिल्लर पार्टीचे शिवप्रभा लाड, पद्मश्री दवे, महेश नेर्लीकर, सलीम महालकरी, अनिल काजवे, ओंकार कांबळे, अभय बकरे, सचिन पाटील, गुलाबराव देशमुख उपस्थित होते.
चौकट
४७ चित्रपट दाखविले ऑनलाईन
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षभरात चिल्लर पार्टीतर्फे प्रत्यक्ष चित्रपट दाखविण्यात आले नव्हते. मात्र, लॉकडाऊनमध्ये चिल्लर पार्टीने सुमारे दोन हजार छोट्या मुलांना जगभरातील ४७ चित्रपट ऑनलाईन पध्दतीने दाखविले.
फोटो (२८०२२०२१-कोल-चिल्लर पार्टी) : कोल्हापुरात रविवारी चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत शाहू स्मारक भवन येथे छोट्या मुलांसाठी ‘एअरबड’ हा बालचित्रपट विनामूल्य दाखवण्यात आला.