कोल्हापूर : चिमगाव (ता. कागल ) आणि मुदाळ (ता. भुदरगड) या दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यांत मद्यसाठा, दोन वाहने असा एकूण सहा लाख ६९ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी दिली.
दोन्ही कारवायांत सराईत गुन्हेगार संतोष बंडू गोविलकर (वय २४, रा. हरळी खुर्द, ता. महागाव रोड, ता. गडहिंग्लज) आणि संशयित रमेश रंगराव टिकोडे (भुदरगड) यांना अटक केली आहे. दोघेही अवैध विदेशी मद्याची वाहतूक करीत होते.अधीक्षक पाटील म्हणाले, चिमगाव परिसरात कारमधून अवैध विदेशी मद्याची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार साध्या वेशात सापळा रचण्यात आला. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कार (एमएच १६, एजे ५६४०) चिमगाव येथून गंगापूर गावाकडे जात होती.
या कारचा पाठलाग करून पथकातील कर्मचाऱ्यांनी कार थांबवून तपासणी केली. त्यामध्ये गोवा बनावटीचे ५९ बॉक्स सापडले. त्यांची किंमत सुमारे तीन लाख ५५ हजार ९२० रुपये आहे. वाहनासह चार लाख ७५ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी संतोष गोविलकर याला ताब्यात घेतले. तो सराईत गुन्हेगार आहे. दुसरी कारवाई मुदाळ (ता. भुदरगड) येथे झाली. या ठिकाणी विदेशी मद्याची वाहतूक करीत असलेल्या कारमधून १९ बॉक्स जप्त करून संशयित रमेश टिकोडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून वाहनासह एकूण एक लाख ९३ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.