कोल्हापूर : राज्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला असून आतापर्यंत ४९ कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. अद्याप कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू नसले तरी १९ लाख टन उसाचे गाळप होऊन ११.३६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.यंदा राज्यात ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने साखर कारखान्यांचे हंगाम लांबणीवर पडला. अद्याप शिवारात पाणी असल्याने ऊसतोड चालत नाही. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी कारखान्यांचा हंगाम दबकतच सुरू आहे. आतापर्यंत राज्यातील ४९ कारखाने सुरू झाले असून १९ लाख टन उसाचे गाळप झाले आहे.
सरासरी ६.९३ टक्के साखर उतारा राखत ११.३६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदा शेतकरी संघटनाही ऊसदराचा मुद्दा फार ताणण्याची शक्यता कमी आहे. एकरकमी एफआरपी देण्यास कारखानदार तयार आहेत. त्यामुळे आठ दिवसांत बहुतांशी कारखाने सुरू होणार असून १५ नोव्हेंबरनंतर हंगामास गती येणार आहे. दरम्यान, मागील हंगामातील चौदा कारखान्यांकडे ८५ कोटी ५० लाख एफआरपीची रक्कम थकीत आहे. १३१ कारखान्यांनी शेतकऱ्यांना १०० टक्के एफआरपी अदा केली आहे.कर्नाटकात हंगामाला गतीकर्नाटकात साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होऊन गती घेतली आहे. विशेषकरून सीमाभागातील कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने कर्नाटकच्या सीमेवर असणाऱ्या सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत कारखानदार उसाची पळवापळवीबाबत चिंतेत आहेत.