उदगाव : चिंचवाड येथील ग्रामपंचायतीचे साहित्य कर्मचाऱ्यांनी घराच्या बांधकामासाठी वापरले असल्याची तक्रार आंदोलन अंकुशचे आप्पासाहेब कदम यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली होती. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीला नोटीसद्वारे संबंधित कर्मचाऱ्यांवर काय कारवाई केली, याचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात खळबळ उडाली आहे.
चिंचवाड (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायतीचे साहित्य स्वत:च्या घराला वापरले आहे. तसेच कर्मचारीच ॲसेसमेंट उताऱ्यावर ग्रामसेवकांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करत आहेत. त्यांची कामात हयगय असल्याची तक्रार कदम यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. याबाबत गटविकास अधिकारी शंकर कवितके यांनी ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांना आदेश काढून या प्रकरणाची चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय या प्रकरणात ग्रामसेवकही जबाबदार असून ते ग्रामस्थांची फसवणूक करीत आहेत. त्यांच्यावरही वस्तुस्थिती पाहून कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.