उदगाव : चिंचवाड (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीमध्ये गेल्या वर्षभरापासून दोन वेळा माहिती अधिकाराचा अर्ज देऊन लेखापरीक्षणाचा अहवाल मागितला होता. मात्र, दोन्ही वेळेला उडवाउडवीची उत्तरे देऊन माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे. याबाबत गटविकास अधिकारी यांना तक्रार करणार असून चिंचवाड ग्रामपंचायतीमध्ये चुकीचा कारभार सुरू असल्याचा आरोप आंदोलन अंकुशचे सदस्य आप्पासो कदम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
पत्रकात म्हटले आहे की, सन २०१४ ते २०१९ या कालावधीतील लेखापरीक्षण अहवाल, कॅश मेमो, वसूल पात्र रक्कम, पूर्तता ठराव याबाबत माहिती अधिकाराअंतर्गत २०१९ मध्ये व १६ डिसेंबर २०२० रोजी असा दोन वेळा अर्ज दिला होता. तत्कालीन ग्रामसेवक भाग्यश्री केदार व एस. डी. पाटील यांनी याबाबत कोणतीही माहिती आपल्याला दिली नाही. तसेच नूतन ग्रामसेवक हनवते यांच्याकडे वारंवार याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये भोंगळ कारभार सुरू असून ग्रामपंचायतीचे २०१४ पासून पुन्हा एकदा लेखापरीक्षण करण्यात यावे, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.