संतोष बामणे - जयसिंगपूर--चिंचवाड (ता. शिरोळ) हे गाव कृष्णाकाठावरील समृद्ध गाव आहे. पूरपरिस्थितील गाव असून लोकसंख्या पाच हजारांवर आहे. येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नसल्यामुळे गावाची आरोग्य सेवा उदगाव येथील उपकेंद्र ‘ब’ यावर अवलंबून आहे. यामुळे आरोग्यसेवेसाठी नागरिकांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून या गावाला प्राथमिक आरोग्य उपकेंद्र होण्याची मागणी होत आहे. आजच्या या धावत्या युगात आरोग्य केंद्राची सेवा देण्यासाठी शासन विविध योजना राबिवत आहे. मात्र, चिंचवाडसाठी स्वतंत्र आरोग्य सेवा कधी मिळणार, असा प्रश्न नागरिकांतून होत आहे. ग्रामपंचायतीकडून अनेकवेळा आरोग्य उपकेंद्रासाठी जिल्हा परिषदेकडे वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्षच झाले आहे. गृहीत आराखड्यामध्ये या गावाचे नाव नसल्यामुळे उपकेंद्र होण्यास अडचणी येत आहेत. जयसिंगपूर ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न मिटल्यानंतर उदगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र झाल्यास चिंचवाडचा प्रश्न निकालात निघण्याची शक्यता आहे.कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या गृहीत आराखड्यात चिंचवाड गावाचा उल्लेखच नसल्यामुळे या गावाकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. चिंचवाड व हाळचिंचवाड हे एकाच गावात दोन भाग लांब अंतरावर असून यामध्ये दोन किलोमीटरचे अंतर आहे. तसेच उदगाव चार किलोमीटर असून, येथे चिंचवाडला सेवा देणारे ‘ब’ हे उपकेंद्र आहे. त्यामुळे या उदगाव येथील उपकेंद्राला चिंचवाड व हाळचिंचवाडला सेवा पुरविताना आरोग्यसेविकांची मोठी दमछाक होते.चिंचवाडच्या नागरिकांना आरोग्यसेवा घेण्यासाठी जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा किंवा सांगली-मिरजचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे येथील उपकेंद्राचा प्रश्न जयसिंगपूर ग्रामीण रुग्णालयामुळे लांबणीवर पडला असून, जयसिंगपूर येथे ग्रामीण रुग्णालय झाल्यावर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे उदगाव येथे स्थलांतरित होणार आहे. तसेच उदगाव येथील ‘अ’ हे उपकेंद्र चिंचवाडला हलविण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य सावकार मादनाईक यांचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच आरोग्य केंद्राच्या गृहीत आराखड्यात चिंचवाडला बसवून उपकेंद्र होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. चिंचवाडमध्ये उपकेंद्र नसल्यामुळे गोरगरिबांना आर्थिक फटका बसत आहे. तसेच येथे वीटभट्टी कामगार मोठ्या प्रमाणात असून, त्यांना आरोग्य सेवा घेणे कठीण बनले आहे. शासनाची आरोग्य सेवा सध्या सर्वत्र ठिकाणी पोहोचली असून, चिंचवाड मात्र वंचित राहिले आहे. तरी लवकरात लवकर येथे उपकें द्र देऊन आरोग्य सेवा पुरवावी. - सुदर्शन ककडे, माजी उपसभापती, शिरोळचिंचवाड ग्रामपंचायतीकडून वेळोवेळी उपकेंद्र होण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे गावातील महिलांना उदगाव, जयसिंगपूरला जाऊन आरोग्य सेवा घ्यावी लागत आहे. यामध्ये महिलांना आर्थिकसह मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे शासनाने त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. - रंजना घाटगे, सरपंच, चिंचवाड
चिंचवाड गाव आरोग्य उपकेंद्रापासून वंचित
By admin | Published: October 09, 2015 11:15 PM