कुपवाड : सूरज फिडे मानांकन खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या सातव्या फेरीअखेर पुण्याचा चिन्मय कुलकर्णी साडेसहा गुणांसह प्रथम स्थानावर आहे, तर इंडियन एअरलाईन्सचा आंतरराष्ट्रीय मास्टर चंद्रशेखर गोखले, तामिळनाडूचा आंतरराष्ट्रीय मास्टर आर. बालसुब्रम्हण्यम सहा गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. नूतन बुद्धिबळ मंडळ व सूरज स्पोर्टस् अॅकॅडमी यांच्यातर्फे कृष्णा व्हॅली क्लबच्या बॅडमिंटन हॉलमध्ये सूरज फिडे मानाकंन खुल्या बुद्धिबळ स्पर्धा सुरु आहेत. यामध्ये तामिळनाडूचा आंतरराष्ट्रीय मास्टर आर. बालसुब्रम्हण्यम व इंडियन एअरलाईन्सचा आंतरराष्ट्रीय मास्टर चंद्रशेखर गोखले यांच्यातील डावाची सुरुवात घोड्याच्या प्याद्याने झाली. डावाच्या सुरुवातीपासून दोघांनी समान चाली रचून शह देण्याचा प्रयत्न केला. २५ व्या चालीला दोघांनी डाव बरोबरीत सोडवून अर्ध्या गुणासह आघाडी कायम केली. पुण्याचा मानांकित चिन्मय कुलकर्णी व सोलापूरचा निखिल बिडकर यांच्यातील डावाची सुरुवात घोड्याच्या प्याद्याने झाली. चिन्मयने रचलेल्या चालीला निखिलने सुरुवातीपासून जशाच तसे प्रत्युत्तर दिले. डावाच्या मध्यात चिन्मयने दिलेला शह परतवून लावण्यात अपयशी ठरलेल्या निखिलचा ३४ व्या चालीला पराभव झाला. मिरजेचा मुदस्सर पटेल व पुण्याचा महेश सैद यांच्यातील डावाची सुरुवात राणीच्या प्याद्याने झाली. मुदस्सरने रचलेल्या चालीना प्रत्युत्तर देण्यात अपयशी ठरलेल्या महेशचा ३५ व्या चालीला पराभव केला. गायत्री रजपूतने श्रीधर वेल्हाळचा, केतन कुलकर्णीने अतुल कुलकर्णीचा, शुभम मालाणीने प्रवीण सावर्डेकरचा, नझीर काझीने केदार जोशीचा, उमेश दांडेकरने मयुरेश मगदूमचा पराभव करून आघाडी कायम केली. (वार्ताहर)इचलकरंजीचा रवींद्र निकम व कोल्हापूरचा श्रीराज भोसले यांच्यातील डावाची सुरुवात राणीच्या प्याद्याने झाली. दोघांनी समान चाली रचून ३७ व्या चालीला डाव बरोबरीत सोडविला. सातारचा हेमंतकुमार मांढरे व पुण्याचा निखिल दीक्षित यांच्यातील डावाची सुरुवात राणीच्या प्याद्याने झाली. दोघांनी डावाच्या सुरुवातीला जशाच तसे प्रत्युत्तर देऊन डावावर समान वर्चस्व राखले. अखेर ४२ व्या चालीला दोघांनी डाव बरोबरीत सोडविला.
चिन्मय कुलकर्णीची विजयी घोडदौड
By admin | Published: December 24, 2016 11:39 PM