- इंदुमती सूर्यवंशी
कोल्हापूर : येथील सिनेसृष्टीचे आशास्थान असलेल्या कोल्हापूर चित्रनगरीसाठी नव्याने २७ कोटी रुपये मिळणार आहे. सध्या तिसऱ्या टप्प्यातील कामांसाठी १५ कोटींची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, चौथ्या टप्प्यासाठी आता अमृत योजनेतून २७ कोटी मिळण्याचा अंदाज आहे. यातून मॅजिक फ्लोअर, वसतिगृह, रेल्वेस्टेशन, पूल, रस्ते, चौक या सेवा सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.
कोल्हापूर चित्रनगरीचे २०१० साली पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कित्येक वर्षे ही इमारत तशीच पडून होती. अखेर २०१५ साली राज्य शासनाचे याकडे लक्ष गेले आणि पहिल्या टप्प्यासाठी १२ कोटींची तरतूद झाली. चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील यांच्यासह व्यवस्थापनाने शासन दरबारी पाठपुरावा केला. त्यातून मुख्य इमारतीचा कायापालट केला गेला. त्यानंतर दुसरा १० कोटींचा टप्पा पूर्ण केला गेला. आता सध्या तिसऱ्या टप्प्यासाठी १५ कोटींचा निधी आला असून त्यातून करण्यात येणाऱ्या विकासकामांसाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता अमृत योजनेतून २७ कोटी मिळणार आहेत. तरीही नेमकी रक्कम किती असेल हे पुढील आठवड्यात समजेल.