आंबा/कोल्हापूर : विशाळगडाजवळील ऐतिहासिक पावनखिंडीत दारू पिणाऱ्यां मद्यपींना शिवराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दुपारी चांगलाच चोप दिला. या परिसरात पुन्हा दारु पिणार नसल्याचा कबुलीजबाब घेत कार्यकर्त्यांनी त्यांना माफी मागायला लावली.शिवराष्ट्र संस्थेमार्फत १३ ते १५ जुलै दरम्यान पन्हाळगड-पावनखिंड मोहीम होती. १५ जुलै रोजी पावनखिंडीमध्ये या मोहिमेचा समारोप झाला. समारोप झाल्यानंतर कार्यकर्ते पांढरपाण्याची दिशेने जात असताना पावनखिंडीत पार्किंग परिसरात पाच ते सहा गाड्यांमध्ये करवीर तालुक्यातील वीस ते पंचवीस जण दारू पीत बसले होते.
ही माहिती मिळताच शिवराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक गाड्याची झडती घेतली. या गाडीमध्ये डॅशबोर्डवर शिवाजी महाराजांचा पुतळा तसेच नंबर प्लेटवर शिवाजी महाराजांचे चित्र होते. त्यामुळे संतप्त शिवभक्त कार्यकर्त्यांनी या दारू पीत बसलेल्या मद्यपींना बाहेर काढून चांगला चोप देत त्यांची दारु उतरवली. यापुढे पावनखिंड परिसरात तसेच किल्ल्यांवर दारू पिणार नसल्याची कबुलीही त्यांच्याकडू कार्यकर्त्यांनी घेतली.दरम्यान, या प्रकारानंतर पावनखिंड परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.