कोल्हापूर : छत्रपती शाहू टर्मिनल्स येथे तिकीट न काढता प्लॅटफॉर्मवर फिरणाऱ्या दोघा तरुणांना रेल्वे पोलीस व तिकीट तपासनिसाने बेदम चोप देत पळवून लावले. दुपारी बारा वाजता रेल्वे स्टेशनवर हा गोंधळ पाहण्यासाठी प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. मारहाणीत प्रदीप राजे व दीपक राजे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, शाहू टर्मिनल्स येथे तिकीट न काढता प्रदीप व दीपक हे प्लॅटफॉर्मवर फिरत होते. यावेळी रेल्वे तिकीट तपासनिसाने त्यांना अडवून तिकिटाची विचारणा केली. यावेळी त्यांनी आम्ही रेल्वेतून प्रवास केलेला नाही, पाहुण्यांना सोडण्यासाठी आलो होतो, असे सांगितले. त्यावर तपासनिसाने तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट का काढले नाही, अशी विचारणा केली. त्याचा राग आल्याने त्या दोघांनी तपासनिसाशी हुज्जत घातली. त्यांच्यातील वाद पाहून रेल्वे पोलीस त्याठिकाणी आले. यावेळी दोघांना बेदम चोप दिला. रेल्वे स्टेशनवरील हा गोंधळ पाहण्यासाठी प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. जखमी तरुणांनी तेथून भीतीने पळ काढला. त्यानंतर दोघेही खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. यावेळी दोघांच्याही अंगावरील कपडे फाडण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणाची मिरज पोलीस व रेल्वे प्रशासनाला माहिती समजताच वरिष्ठ अधिकारी कोल्हापुरात आले. त्यांनी संबंधित जखमी तरुणांची रुग्णालयात जावून चौकशी केली. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी रेल्वे पोलिसांत नोंद झाली नव्हती. (प्रतिनिधी) संबंधित पोलिसाची तडकाफडकी बदलीमिरज : कोल्हापूर रेल्वेस्थानकात विनातिकीट असल्याच्या कारणावरून दोघांना मारहाण केल्याबद्दल जयंत शिवाजी पाटील या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याची तडकाफडकी मिरजेला बदली करण्यात आली. विनातिकीट आलेल्या दोघा भावांना जयंत पाटील याने मारहाण केल्याची तक्रार आहे.पोलिसांना नोटीसरेल्वे पोलीस व तिकीट तपासनिस यांनी कायदेशीर गुन्हा दाखल करण्याऐवजी त्या तरुणांना मारहाण केल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. मारहाण करणाऱ्या पोलीस व तपासनिसाची कानउघाडणी करत ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्लॅटफॉर्म तिकिटावरून दोघांना चोप
By admin | Published: March 18, 2015 12:48 AM