कोल्हापूर : घरोघरी ख्रिसमस ट्रीची सजावट, चर्चना आकर्षक विद्युत रोषणाई, केक-चॉकलेटस्ची धूम, सांताक्लॉजची वेशभूषा, आकर्षक गिफ्ट पॅकिंग, जिंगल बेलची गाणी अशा पद्धतीने शहरातील वातावरण शनिवारी नाताळमय बनले. ख्रिस्तीबांधवांची दिवसभर नाताळ सणाच्या तयारीची लगबग सुरू होती. आज, रविवारी शहरातील विविध चर्चमध्ये प्रार्थना, विशेष उपासना सभांचे आयोजन केले आहे.नाताळ प्रेषित येशूंचा जन्मदिन म्हणून तो साजरा केला जातो. या सणाचा आनंद द्विगुणित करताना महाद्वार रोड, पापाची तिकटी येथील बाजारपेठेत विविध ख्रिसमस ट्री, सजावटीचे साहित्य, केक-चॉकलेट्स, आप्तेष्टांना देण्यासाठी भेटवस्तूंची खरेदी करण्यास गर्दी झाली होती. त्यात फूड गिफ्टस्, गिफ्ट बास्केटस्, ख्रिसमस कार्डस् अशा वस्तूंसह विविध वस्तूंचा समावेश होता. बच्चेकंपनीस भेटवस्तू देण्यासाठी खेळण्यांच्या दुकानांतही पालकांची गर्दी होती. ख्रिस्तीबांधवांच्या घरामध्ये करंजी, लाडू, चकली आणि चिवड्यासह दोदोल, बिबिंका, करमला, बॉलिना, दोस, पिनाका, स्नोबॉल कुकीज अशा फराळाची रेलचेल सुरू होती. अधिकतर जणांनी तयार फराळ खरेदीला प्राधान्य दिले आहे. ख्रिसमस केक, प्लम केक, रम केक अशा केकची आॅर्डर देण्यासाठी ख्रिस्ती बांधवांची शहरातील विविध केक शॉप, बेकरींत गर्दी दिसून आली. केक्स, पेस्ट्री, शॉप्समध्ये १८ ते २० विविध फ्लेवर्समध्ये चॉकलेट बॉक्स उपलब्ध आहेत. त्यावर सांताक्लॉज, स्मॉल हाऊसेस, जिंगल बेल्स, गवताळ कुरण, बायबलमधील प्रसंग साकारले आहेत. नागाळा पार्कमधील ख्राईस्ट चर्च, कसबा बावड्यातील सेंट फ्रान्सिस झेव्हिअर्स चर्च, रेसिडेन्सी क्लब येथील आॅल सेंट चर्च, होलिक्रॉस चर्च, शिवाजी पार्कमधील सेवंथ डे अॅडव्हॅनटिस्ट चर्च, विक्रमनगरमधील ख्रिश्चन चर्च तसेच ब्रह्मपुरीतील पवित्र उपासना मंदिर या चर्चमध्ये प्रार्थना सभांचे आयोजन केले आहे. (प्रतिनिधी)विशेष उपासना सभा आज ख्रिसमसनिमित्त आज, रविवारी न्यू शाहूपरी येथील वायल्डर मेमोरियल चर्चमध्ये विशेष उपासना सभा होणार आहे. सकाळी ८ वाजता इंग्रजी उपासना, सकाळी ९.४५ वाजता पहिली मराठी उपासना, सकाळी ११.४५ वाजता दुसरी मराठी उपासना, दुपारी १२.३० वाजता तिसरी मराठी उपासना होणार आहे. सायंकाळी ६ वाजता महापालिकेजवळील शहर उपासना मंदिरात ख्रिस्त जन्मदिनाची मराठी उपासना होईल. या उपासनेमध्ये रेव्ह. जे. ए. हिरवे, डी. बी. समुद्रे हे मार्गदर्शन करतील.
नाताळच्या पूर्वसंध्येला उत्साहास उधाण, बाजारपेठ सजली
By admin | Published: December 25, 2016 12:02 AM