कोल्हापूर : ख्रिस्ती बांधवांच्या पवित्र नाताळ सणाची लगबग आता शहरात सुरु झाली आहे. यानिमित्त शहरातील विविध चर्चमध्ये सणाची तयारी सुरू असून चर्चना आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे.प्रभू येशूंचा जन्मदिवस असलेला ख्रिसमस अर्थात नाताळ हा सण मंगळवारी (दि. २५) साजरा होत आहे. हा सण ख्रिस्ती बांधवांकडून मोठ्या प्रमाणात साजरा होत असला तरी अन्य सर्व धर्मिय नागरिकांनीही या सणाला आपलेसे केले आहे.
या सणाच्या निमित्ताने सजवले जाणारे ख्रिसमस ट्री, सॅन्ताक्लॉजचे कपडे, गिफ्ट याचे लहानांनाच काय मोठ्यांनाही आकर्षण असते. अजूनही पालक लहान मुलांच्या उशाला त्यांचे आवडते गिप्ट ठेवतात आणि सॅन्ताक्लॉजच्या आठवणीत लहान मुले रंगून जातात.नाताळ आता दोन दिवसांवर आल्याने ख्रिस्ती बांधवांच्या घराघरात सणाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे. शहरातील सर्व चर्चना रंगरंगोटी व विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे. तर सणासाठी बाजारपेठदेखील सजली आहे.शहरातील पापाची तिकटी, पानलाईन, राजारामपूरी, मध्यवर्ती बसस्थानक या महत्वाच्या बाजारपेठेत लहान मोठ्या आकाराचे ख्रिसमस ट्री, जिंगलबेल्स, चांदण्या, सांताक्लॉजचे शर्ट, शुभेच्छापत्रे, सांताक्लॉज टोपी, कपडे, चॉकलेटस, कॅडबरी, सजावटीचे साहित्य, रंगीबेरंगी मेणबत्या आणि डिझायनर जिंगल बेल्सना अधिक मागणी आहे.
या दिवशी केक कापले जात असल्याने बेकरीमध्ये विविध फ्लेवरमधले व विविध आकारातले साधे केक, पेस्ट्री केक सजले आहेत. ख्रिस्ती बांधवांबरोबरच अनय् नागरिकांकडूनही या साहित्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे.