लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ख्रिस्त जन्मोत्सव व नववर्षानिमित्त होणारे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. नाताळ दिवशी दोन सत्रांत होणारी जन्मदिन उपासना गर्दी टाळण्यासाठी सहा सत्रांमध्ये आयोजित करण्यात आली आहे.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाताळ सणानिमित्त होणारे रद्द करण्याचा निर्णय वायल्डर मेमोरियल चर्च (के.सी.सी)च्या सेशन समितीने घेतला आहे. उपासनेसाठी येणाऱ्या बांधवांच्या सुरक्षेसाठी त्यांची थर्मल चाचणी, आरोग्य चाचणी केली जाणार आहे. याकरीता विशेष आरोग्य पथकाचीही निर्मिती करण्यात आली आहे. विशेष खबरदारी म्हणून संपूर्ण सर्व चर्चचे सॅनिटायझेशन व रंगरंगोटी केली जात आहे.
नियमित धार्मिक उपासना पाळक रेव्ह. डी. बी. समुद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. शहरातील पापाची तिकटी, महाद्वार रोड, राजारामपुरी आदी ठिकाणी नाताळ सणासाठी लागणारे ख्रिसमस ट्री, सांताक्लाॅज, टोपी, शोभेचे साहित्य आदी वस्तू बाजारात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या आहेत.
उपासना कार्यक्रम असा, रविवारी (दि.२०) ते २ जानेवारी २०२१ या दरम्यान उपासना आयोजित केली आहे. उपासना व कॅन्डल लाईट सर्व्हिस सावित्रीबाई फुले व आयसोलेशन हाॅस्पिटलमध्ये फळे वाटप कार्यक्रम होणार आहे. शुक्रवारी (दि.२५) मुख्य दिवशी सकाळी ८.१५ ते रात्री नऊ वाजेपर्यंत वायल्डर मेमोरियल चर्च येथे सुवार्ता प्रसारासह मराठी व इंग्रजी उपासना सहा सत्रांत आयोजित केली आहे. याच दिवशी सकाळी ९ १५ ते ९.४५ या कालावधीत कळंबा जेल येथेही कैद्यांकरीता उपासना केली जाणार आहे. गुरुवारी (दि. ३१) ला रात्री १० वाजता वाॅच नाईट सर्व्हिस व प्रभु भोजन कार्यक्रम होणार आहे. यासह संस्थेअंतर्गत असलेल्या चर्चमध्येही उपासना कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
फोटो : १६१२२०२०-कोल-चर्च०१
आेळी : नाताळनिमित्त ताराबाई पार्क येथील सेंट ऑल चर्चमध्ये नाताळच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रंगरंगोटी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.
फोटो : १६१२२०२०-कोल-चर्च०१
आेळी : ख्रिसमसच्या तयारीसाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. अशाच साहित्यांमध्ये ख्रिसमस ट्रीची पापाची तिकटी येथे पाहणी करताना एक मुलगी.
(छाया : आदित्य वेल्हाळ)