ज्योती पाटील
पाचगाव : शहरातील स्वातंत्र्यसैनिक कॉलनी प्रभाग क्र. ६६ हा प्रभाग यंदा सर्वसाधारण झाल्याने या प्रभागातून निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी सर्वच पक्षांतील इच्छुकांनी जोरदार तयारी केली आहे. इच्छुकांची संख्या मोठी असली तरी पक्षांकडून उमेदवारी मिळविण्यासाठी या प्रभागात मोठी चुरस आहे. त्यासाठी त्यांनी नेत्यांकडे मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शहराला लागूनच असणाऱ्या या प्रभागात जवळजवळ ६० टक्के झोपडपट्टीधारक आहेत. गवंडी, सेंट्रिंग काम, धुणीभांडी व मोलमजुरी करणाऱ्यांची संख्या या प्रभागात जास्त आहे. १० ते १२ कॉलन्यांनी मिळून बनलेल्या या प्रभागात सहा ते साडेसहा हजार मतदार आहेत. मात्र, झोपडपट्टीतील मतदानावरच येथील गुलाल ठरतो. त्यामुळे इच्छुकांनी याच भागावर जास्त लक्ष केंद्रित केल्याचे चित्र आहे. २००५ मध्ये महेश वासुदेव, २०१० मध्ये भूपाल शेटे, तर २०१५ मध्ये रूपाराणी निकम यांनी या प्रभागाचे प्रतिनिधित्व केले आहे. यंदाच्या निवडणुकीत या प्रभागातून पुन्हा एकदा भाजप -ताराराणी आघाडीकडून रूपाराणी निकम या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. मागील पाच वर्षांत केलेल्या कामाच्या जोरावरच त्या पुन्हा मतदारांसमोर जाणार आहेत. आपल्या सामाजिक कार्याच्या जोरावर अभिजित पाटील यांनीही महापालिका गाठण्यासाठी या प्रभागातून जोरदार तयारी केली आहे. काँग्रेसकडून राजेंद्र साबळे हेही मनपात जाण्यासाठी इच्छुक आहेत. मुस्ताक मलबारी यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारीचा दावा केला आहे, तर शिवसेनेकडून अजय मगदूम इच्छुक आहेत. या प्रभागात सर्वच पक्षांत इच्छुकांची संख्या जास्त असली तरी भाजप-काँग्रेसमध्येच सामना रंगणार असे चित्र आहे.
गत निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते
रूपाराणी निकम : (भाजप ताराराणी) १९२६
जयश्री साबळे : (कॉंग्रेस) १०९६
आशा सोरटे : (राष्ट्रवादी) ७०२
कोमल बिरजे : (शिवसेना) १४१
कोट : गेल्या पाच वर्षांत प्रभागात कोट्यवधी रुपयांची अनेक विकासकामे केली असून, भागातील अनेक समस्या सोडविल्या आहेत. बचत गटामार्फत महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून दिला आहे. वृक्षारोपण, अंतर्गत रस्ते, गटर्स, हॉल, शाळा सुशोभीकरण, एलइडी, पाईपलाईन, अमृत योजनेचे काम मार्गी लावले आहे. यापुढेही जनतेने संधी दिल्यास उर्वरित कामे पूर्ण करून महिलांना कायमचा रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर असेल. रूपाराणी निकम, विद्यमान नगरसेवक, (भाजप ताराराणी)
सोडवलेले प्रश्न : अनेक अंतर्गत रस्ते, प्रभागात ऑक्सिजन पार्क, शाळेचे सुशोभीकरण, प्रभागातील गटर्स, पाण्याच्या पाईपलाईन,
ओढ्यावरील पूल, हॉल, एलईडी लाईट
प्रभागातील समस्या : अनेक ठिकाणची गटर्स व्यवस्थित नसल्याने दुर्गंधी पसरते. अनेक ठिकाणचा ओपन स्पेस अतिक्रमणाच्या विळख्यात,
कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने अनेक ठिकाणी पाणी वेळेवर मिळत नाही. वेळेत स्वच्छता होत नसल्याने कचरा रस्त्यावर विखुरला जातो.