कोल्हापूर : रुईकर कॉलनी येथील तीन गुंठे जागेच्या व्यवहारातील १९ लाख रुपये घेऊन जात असताना समोरून दुचाकीवरून आलेल्या तिघा तरुणांनी दोघा वृद्धांच्या डोळ्यांत चटणीपूड फेकून, हातावर कोयत्याने वार करून सुमारे १७ लाख १९ हजारांची रोकड असलेली पिशवी लांबविली. शुक्रवारी भरदुपारी दोनच्या सुमारास रुईकर कॉलनी, राजेश मोटर्ससमोर ही घटना घडल्याने खळबळ उडाली.संशयितांनी केलेल्या कोयता हल्ल्यामध्ये जमीन खरेदी-विक्रीचे एजंट चारूदत्त अण्णा कोगे (वय ७०, रा. चिंचवाड, ता. करवीर) हे जखमी झाले. त्यांना पोलिसांनी तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले. या घटनेवेळी कोगे यांच्यासोबत दिनकर बंडोपंत जाधव (६५, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) होते.पोलिसांनी शहराच्या नऊ नाक्यांवर नाकाबंदी करून लुटारूंचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. महाडिक कॉलनी येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे तिघे लुटारू कॅमेराबद्ध झाले आहेत. दरम्यान, लूटमारीची घटना घडल्यापासून या व्यवहारातील काही तरुण गायब आहेत. त्यांचे मोबाईलही बंद आहेत. कमिशनमधील वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. संशयित तिघा तरुणांची नावे जखमी चारूदत्त कोगे यांनी पोलिसांना दिली आहेत. त्यानुसार पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.चारूदत्त कोगे व दिनकर जाधव या दोघांचा जमीन-खरेदीविक्रीचा व्यवसाय आहे. रुईकर कॉलनी, महाडिक वसाहत परिसरात सूर्यकांत नलवडे यांचा तीन गुंठे रिकामा प्लॉट आहे. या जागेचा महिन्याभरापासून व्यवहार सुरू आहे. आशा करण जाधव (रा. उद्यमनगर) यांनी हा प्लॉट १ कोटी १९ लाख रुपयांना खरेदी केला. या व्यवहारात कोगे व जाधव यांनी मध्यस्थी केली होती. जागामालक नलवडे यांना यापूर्वीच एक कोटी रुपये दिले. उर्वरित १९ लाख रुपये द्यायचे होते. ही रक्कम नेण्यासाठी शुक्रवारी दुपारी ते दोघे आशा जाधव यांच्याकडे आले. जाधव या धनादेश देत असताना त्यांनी रोख पैशांची मागणी केली. त्यानुसार १९ लाख रुपये पिशवीत घेऊन ते बाहेर पडले. दिनकर जाधव हे दुचाकी चालवीत होते; तर चारूदत्त कोगे पाठीमागे बसले होते. त्यांच्या उजव्या हातामध्ये कापडी पिशवी होती. ही रक्कम घेऊन ते घरी चालले होते.कावळा नाका ते रुईकर कॉलनी या मुख्य रस्त्यावर येताच राजेश मोटर्ससमोर उलट दिशेने तिघे अनोळखी तरुण समोर आले. त्यांपैकी एकजण पाठीमागे उतरला. दोघेजण पुढे आले. त्यांनी दिनकर जाधव यांच्या डोळ्यांत चटणीपूड फेकली. अचानक हल्ला झाल्याने ते बिथरून गेले. दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या तरुणाने चारूदत्त कोगे यांच्या हातातील पिशवी जबरदस्तीने काढून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघांच्यात रस्त्यावर झटापट झाली. त्याने जवळ असलेल्या चाकूने कोगे यांच्या हातावर वार केल्याने पिशवीचा बंध तुटून काही रोकड रस्त्यावर पडली. यावेळी लुटारूंनी पिशवी घेऊन तेथून पोबारा केला. जाधव यांच्या डोळ्यांत चटणीपूड गेल्याने त्यांना काहीच सुचत नव्हते; तर कोगे भेदरून गेले होते. त्यांच्या हातातून रक्तस्राव होत होता. रस्त्यावरून ये-जा करणारे वाहनधारक त्यांच्या मदतीसाठी धावले. नागरिकांनी या प्रकाराची माहिती पोलीस नियंंत्रण कक्षाला दिली. तेथून तत्काळ शाहूपुूरी पोलिसांना कळविण्यात आले. शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पोलीस निरीक्षक संजय मोरे व गुन्हे शाखेच्या कर्मचाºयांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावर पडलेली रोकड पोलिसांनी ताब्यात घेतली. ती मोजली असता २ लाख ८१ हजार रुपये होते. त्यानंतर चोरट्यांनी सुमारे १७ लाख १९ हजार रुपये लंपास केल्याचे निष्पन्न झाले. जखमी कोगे यांना तत्काळ सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर कोगे व जाधव यांच्याकडून पोलिसांनी व्यवहारासंबंधी माहिती घेतली.कट रचून लूटमारअरुण जाधव व सूर्यकांत नलवडे यांच्या प्लॉटचा व्यवहार एक महिन्यापासून सुरू होता. तो एजंट चारूदत्त कोगे व दिनकर जाधव हे करीत होते. या व्यवहारामध्ये कमिशनवरून त्यांचा अन्य एजंट तरुणांसोबत वाद झाला होता. कोगे व जाधव शुक्रवारी पैसे घेण्यासाठी रुईकर कॉलनीत जाणार होते. त्याठिकाणी त्यांना पैसे मिळाले. तेथून ते बाहेर पडले. ही टिप तरुणांना वेळोवेळी कोणीतरी देत होते. पाळत ठेवून, कट रचून ही लूटमार केल्याचे तपासात पुढे आले आहे.लुटारू सीसीटीव्हीत कैदभरदुपारी घडलेली लूटमार महाडिक कॉलनी येथील एका सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाली आहे. त्यामध्ये दुचाकीवरून तिघे लुटारू येताना स्पष्टपणे दिसत आहेत. दुचाकी चालविणाºयाने पिवळा शर्ट व काळी पॅँट घातली आहे; तर पाठीमागे बसलेला तरुण अंगाने मजबूत आहे. त्याने गुलाबी शर्ट घातला आहे. काठीला कोयता बांधला होता. सहजासहजी लांबूनच हल्ला करून रोकड लंपास करता येईल, असा त्यांचा बेत होता.
चटणीपूड टाकून १७ लाख लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 1:01 AM