कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत प्रत्येक महिन्याच्या चौथ्या रविवारी छोट्या मुलांसाठी दाखविण्यात येणाऱ्या सिनेमांचे प्रदर्शनही थांबवण्यात आले होते. मात्र, या काळात तब्बल ४८ बालचित्रपट ऑनलाइन दाखविण्यात आले होते. आता २८ फेब्रुवारीपासून चिल्लर पार्टीसाठी हा सिनेमाचा प्रत्यक्ष पडदा पुन्हा उघडणार आहे. गेली नऊ महिने प्रत्यक्ष चित्रपटगृहातील सिनेमांचे प्रदर्शन बंद होते.लॉकडाऊनच्या काळातही चिल्लर पार्टीच्या छोट्यांसाठी सिनेमा दाखविण्याच्या उपक्रमात खंड पडला नव्हता. ऑनलाइन पद्धतीने पालकांचे व्हॉटस्ॲप ग्रुप तयार करून त्या माध्यमातून दर रविवारी बालचित्रपटांच्या लिंक पाठवल्या. कोल्हापुरातीलच नव्हे तर जगभरातील दोन हजार पालक आणि मुले या माध्यमातून सहभागी झाले. या काळात जगभरातील एकूण ४८ बालचित्रपटांची पर्वणी छोट्या मुलांबरोबर पालकांनाही मिळाली.व्हिडिओच्या माध्यमातून कलाकारांनी साधला संवादयानिमित्त चिल्लर पार्टीच्या व्यासपीठावरून अभिनेता सागर तळाशीकर, स्वप्नील राजशेखर, आनंद काळे, शशांक शेंडे, समिधा गुरू, चंद्रकांत जोशी, दिलीप बापट, प्रभाकर वर्तक, शरद भुताडीया, संजय मोहिते, भरत दैनी, विद्यासागर अध्यापक, रेहान नदाफ, अनुप बेलवलकर, रोहित हळदीकर, अजय कुरणे आदी कलाकारांनी व्हिडिओच्या माध्यमातून मुलांशी संवाद साधला. हे व्हिडिओ चिल्लर पार्टीच्या फेसबुक आणि व्हॉट्सॲप ग्रुपवरून प्रसारित करण्यात आले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत प्रत्येक महिन्याच्या चौथ्या रविवारी छोट्या मुलांसाठी विनामूल्य सिनेमा दाखविण्यात येतात. लॉकडाऊननंतर आता फेब्रवारी महिन्यापासून पुन्हा शाहू स्मारक भवन येथे सिनेमे दाखविण्यात येणार आहेत. या उपक्रमात मोठ्या संख्येने छोट्यांनी सहभागी व्हावे आणि जगभरातील बालचित्रपटांचा आनंद घ्यावा.-मिलिंद यादव,चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ