राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत शिधापत्रिकेमधील नावे कमी-जास्त करण्यासाठी गडहिंग्लज तालुक्यात उद्या (मंगळवारी) सकाळी ११ वाजता महसूल मंडलनिहाय विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार दिनेश पारगे यांनी दिली.
पारगे म्हणाले, २०१३ मध्ये अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत शासनाने गरजू व पात्र लाभार्थ्यांची यादी तयार केली. त्यानुसार त्यांना नियमाप्रमाणे धान्याचे वाटप करण्यात येत आहे.
तथापि, या यादीमधील काही लाभार्थी मयत झालेले आहेत. काही लाभार्थ्यांच्या मुलींचे विवाह होऊन त्या बाहेरगावी गेलेल्या आहेत. त्यांची नावे यादीमधून कमी न झाल्यामुळे नियमाप्रमाणे देय धान्य वाटप करण्यात येत आहे.
दरम्यान, गावातील अन्य लाभार्थी कायद्यानुसार धान्य मिळण्यास पात्र असतानाही केवळ गावात अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत विहित कोटा पूर्ण झाल्यामुळे गरजूंना धान्य वितरित करणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे पात्र सर्व लाभार्थ्यांना कायद्यानुसार धान्य देणे आवश्यक असल्यामुळे संबंधितांनी शिधापत्रिकेतील नावे कमी-जास्त करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठीच या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे, असेही पारगे यांनी सांगितले.
------------------------------
* याठिकाणी होणार शिबिरे
गडहिंग्लज, नेसरी, महागाव, कडगाव, दुंडगे, नूल व हलकर्णी या मंडल कार्यालयात ही शिबिरे होतील. याठिकाणी मंडल अधिकारी, महा-ई-सेवा केंद्राचे प्रतिनिधी व रेशन दुकानदार उपस्थित असतील.
------------------------------
* शिधापत्रिकेतील मयत व्यक्ती व विवाहित मुलींची नावे कमी करणे आणि नवीन नावे दाखल करण्यासाठी अर्ज स्वीकारण्यात येतील. लोकांना तहसील कार्यालयाला हेलपाटे मारावे लागू नयेत, म्हणूनच मंडल कार्यालयाच्या ठिकाणी ही शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.