कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात स्थापन व्हावे, या मागणी संदर्भात आज, शुक्रवारी मुंबईत मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांच्या चेंबरमध्ये सायंकाळी साडेपाचच्या सुमारास खंडपीठ कृती समितीची बैठक होत आहे. बैठकीसाठी उपस्थित राहण्यासाठी कृती समितीचे पदाधिकारी गुरुवारी रात्री मुंबईला रवाना झाले. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व सोलापूर या सहा जिल्ह्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन व्हावे, या मागणीसाठी गेली २८ वर्षे संघटितपणे आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाची दखल घेत शासनाने सहा जिल्ह्यांसाठी सर्किट बेंच स्थापन करावे, असा ठराव मंजूर केला आहे. या निर्णयामुळे चालू असलेला लढा आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. कृती समितीने आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी २० मे रोजी कोल्हापुरात बैठक घेतली होती. यावेळी बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र व गोवाचे सदस्य शिवाजीराव चव्हाण यांनी कृती समितीने आंदोलनाबाबत कोणताही निर्णय तूर्त न घेता मुख्य न्यायाधीशांना पत्र देऊन निर्णयाबाबत विचारणा करावी, असे सुचविले होते. त्यानुसार २१ मेला न्यायाधीश शहा यांना कृती समितीने पत्रव्यवहार करून बैठक घेण्यासाठी विनंती केली होती; परंतु त्याबातत कोणतेच उत्तर न आल्याने पुन्हा ९ जूनला पत्र पाठविण्यात आले होते. या पत्राच्या अनुषंगाने १९ जूनला खंडपीठ कृती समितीला मुख्य न्यायाधीशांनी चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर पहिलीच बैठक होत असल्याचे निमंत्रक अॅड. चव्हाण यांनी सांगितले.
‘सर्किट बेंच’प्रश्नी आज बैठक; खंडपीठ कृती समिती मुंबईला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2015 9:57 PM