कोल्हापूर : गेले आठ महिने कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचा एक रुपयाही न घेता मी काम करीत आहे. माझ्यावर वैयक्तिक आरोप करू नका. मला पैशाचे सांगायचे नाही. सकाळ, दुपार मी कोल्हापूर सर्किट बेंच होण्यासाठी राबतोय; त्याचा जरा विचार करा...’ अशी आक्रमक भूमिका बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रशांत चिटणीस यांनी मांडली. जिल्हा बार असोसिएशनची सर्किट बेंचप्रश्नी तहकूब सभा न्यायसंकुलमधील राजर्षी शाहू सभागृहात बोलाविण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.चिटणीस म्हणाले, मी सर्किट बेंच होण्यासाठी प्रयत्नशील आहे. मी त्यासाठी राबतोय. रात्री तीन वाजता दिल्लीहून आलो तरी पुन्हा मी सकाळी नागपूरला याच कामासाठी गेलो. तुम्हाला कोणत्याही गोष्टी सांगितलेल्या नाहीत व तुम्हाला सांगून त्या केलेल्या नाहीत. तुम्ही चर्चा करा. तुमचा-आमचा व्यवसाय एक. कृपया सभेत चर्चा करू नका. चर्चा करून या ठिकाणी तुमचे मत मांडा. तेथेच नंतर (व्यासपीठाच्या समोर) मी बसणार आहे.
मी मीटिंगचे नाव सांगून माझ्या कुटुंबाला बाहेर घेऊन जातो असे आरोप काहीजण करतात. कुणावर आरोप करताय, त्याची लाज वाटायला पाहिजे. मला बोलायचे आहे तर तोंडावर येऊन बोला. माघारी चर्चा करायची नाही. माझा अपमान होतो तेथे मी बोलून घेणार नाही; अन्यथा मी बांगड्या भरल्यात असे कोण समजून कोण बोलायला लागले तर मी ते खपवून घेणार नाही, अशी रोखठोकपणे आपल्या भावनांना चिटणीस यांनी वाट मोकळी करून दिली.