कोल्हापूर : कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच होण्यासाठी सोमवार (दि. ८) नंतर बैठक घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनला दिले आहे. कोल्हापूर हद्दवाढप्रश्नी सोमवारी (दि. १) मुंबईत बैठक होती, त्यावेळी आमदार अमल महाडिक, बारचे माजी अध्यक्ष अॅड. विवेक घाटगे व अॅड. विजय महाजन यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतली. त्यावेळी फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशन झाल्यानंतर बैठक घेऊ, असे सांगितले. शुक्रवारी (दि. ५) अधिवेशन संपणार आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी १२ आॅगस्टच्या आत बैठकीचे आयोजन केले जाईल, असे अभिवचन बार असोसिएशनला दिले. कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे प्रथम सर्किट बेंच व त्यानंतर खंडपीठ व्हावे या मागणीसाठी खंडपीठ कृती समितीने दोन वेळा फडणवीस यांच्या बैठकीची वेळ मागितली होती; पण दोन्ही वेळा काही कारणास्तव बैठक होऊ शकली नाही. दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरात सहा जिल्ह्यांतील खंडपीठ कृती समितीची बैठक झाली. त्यामध्ये १९ आॅगस्टला या सहाही जिल्ह्यांत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय वकील बांधवांनी घेतला आहे. सोमवारी कोल्हापूरच्या हद्दवाढप्रश्नी मुंबईत बैठक होती. ती झाल्यानंतर अॅड. घाटगे, अॅड. महाजन व आमदार महाडिक यांनी सर्किट बेंचप्रश्नी मुख्यामंत्र्यांची भेट घेतली. या तिघांनी कोणत्याही स्थितीत कोल्हापुरात सर्किट बेंच झाले पाहिजे व उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती व आपली संयुक्त बैठक व्हावी अशी मागणी केली. त्यावर शुक्रवारी अधिवेशन संपत आहे. त्यानंतर सोमवारनंतर सर्किट बेंचप्रश्नी बैठक घेऊ, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.
सर्किट बेंचप्रश्नी मुंबईत सोमवारनंतर बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2016 1:08 AM