संदीप बावचे : जयसिंगपूर
प्रभागरचनेनंतर आता प्रभागातील आरक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे. बारा प्रभागांतून २४ नगरसेवक निवडले जाणार असून, प्रभागातील आरक्षण चक्राकार (रोटेशन) पद्धतीने होणार आहे. ५० टक्के महिला आरक्षण असणार आहे, तर उर्वरित जागेवरील आरक्षणानंतरच खऱ्या अर्थाने मोर्चेबांधणीला वेग येणार आहे.
एकसदस्यीयऐवजी द्विसदस्यीय प्रभागरचना निश्चित झाल्यामुळे पालिकेतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गत निवडणुकीत बारा प्रभागांतून २४ नगरसेवकांची संख्या होती. ३ स्वीकृत, तर लोकनियुक्त नगराध्यक्ष असे चित्र होते. येणाऱ्या निवडणुकीत नगरसेवकांतून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाचे आरक्षण आणि बहुमत याचे गणित आतापासूनच मांडले जात आहे. लोकसंख्येच्या तुलनेत गेल्या पाच वर्षांत प्रभागातील मतदारांच्या संख्येत काहीशी वाढ झाली आहे. त्यानुसार एक प्रभाग २८०० ते ३००० मतदारांचा राहणार आहे. गेल्या साडेचार वर्षांत शाहू व ताराराणी आघाडीत कधी सहमतीचे, तर कधी वादाचे राजकारण दिसून आले, तर ताराराणी आघाडीत एकसंघपणा दिसून आला नाही. आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागरचना ‘जैसे थे’ राहिल्यामुळे अपक्षांना लगाम लागणार असला तरी गतनिवडणुकीत दोन अपक्षांनी बाजी मारली होती. त्यामुळे काही प्रभागांत अपक्ष उमेदवारांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारतीय जनता पक्षाने स्वबळाचा नारा दिला असला तरी निवडणुकीपर्यंत तो टिकणार का, अशी चर्चा आहे. एकूणच प्रभाग रचनेनंतर राजकीय हालचाली गतिमान होत आहेत. पालिकेची निवडणूक निश्चित वेळेत होणार का, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------------
चौकट - केडीसीसीनंतर पालिकेचे चित्र
सध्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याविरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी मोट बांधली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणूक निकालानंतरच जयसिंगपूर पालिकेतील लढतीचेदेखील चित्र स्पष्ट होणार आहे.