कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातमाो मागील दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. पडणाऱ्या पावसाचे प्रमाण पाहता आज रात्रीच राजाराम बंधारा येथील इशारा पातळी ओलांडली जाईल. त्यामुळे न
गावांनी विशेषत: चिखली, आंबेवाडी ग्रामस्थांनी त्वरित स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व उप विभागीय अधिकारी आणि तहसिलदार यांच्याशी संपर्क साधून आढावा घेतला.
यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी देसाई यावेळी म्हणाले, दिवसाला सरासरी 150 मिमी पाऊस पडत असल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे आज रात्रीच राजाराम बंधारा येथील इशारा पातळी ओलांडली जाईल. त्यामुळे नागरिकांच्या स्थलांतराला तात्काळ सुरूवात करावी. नागरिकांनीही विशेषत: नदीकाठच्या गावातील लोकांनी आपल्या जनावरांसह सुरक्षित स्थळी स्थलांतरीत होवून प्रशासनाला सहकार्य करावे.
गावा-गावात दवंडी देवून नागरिकांना सावधानतेचा इशारा देवून सतर्क करा. ग्रामस्थांचे स्थलांतर करताना त्यांची काळजी घ्या. ज्या गावांचा संपर्क तुटलेला आहे अशा ठिकाणी पर्यायी मार्गाचा सक्तीने वापर करायला लावा. ज्या रस्त्यांवर पाणी आले आहे तेथे बॅरिकेट्स लावून सुरक्षा रक्षकांची नेमणूक करा. कोणताही धोका निर्माण होणार नाही.
कोव्हिड रूग्णांची सुविधा आणि सोय करा
संपर्क तुटलेल्या गावांमध्ये कोव्हिडचे रूग्ण अत्यवस्थ झाल्यास त्यांच्या उपचारासाठी पर्यायी मार्गाने सुविधा करा. कोव्हिड केंद्रामध्ये ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध ठेवा. स्थलांतरीत करताना कोव्हिड रूग्णांसाठी योग्य अंतर राखले जाईल याची काळजी घ्या. ज्यांचे स्वॅब घेतले आहेत, जे संशयित आहेत अशांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवा.
व्हेंटिलेटर्स उपलब्ध ठेवा. मंगल कार्यालय, शाळा, महाविद्यालयांचे वसतिगृह आदी ठिकाणी नियोजन करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी दिल्या.
स्थानिक बोटींसाठी लाईफ जॅकेट सक्तीचे
ज्या गावांमध्ये स्थानिक बोटी आहेत विशेषत: शिरोळ तालुक्यात त्या बोटी चालवण्यासाठी लाईफ जॅकेट सक्तीने असले पाहिजे. त्यासाठी गावांमध्ये 10-10 लाईफ जॅकेट द्यावेत. प्रत्येक तालुक्याला रेस्क्यू फोर्सचे वाटप केले आहे. त्या पथकांना आजच बोलवून घेवून नियोजन करा. जनावरांना स्थलांतरासाठी प्राधान्य द्या. पहिल्या टप्प्यात बाधित होणाऱ्या गावातील कुटूंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करा, असेही ते म्हणाले.
पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख म्हणाले, सर्व पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून पब्लिक ॲड्रेस सिस्टीमचा वापर करून बाधित होणाऱ्या गावांमधील नागरिकांना आजच स्थलांतरीत करा. वैद्यकीय अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून ऑक्सिजन सिलींडर, औषधांचा साठा याबाबत नियोजन करा. गतवर्षीचा अनुभव पाहून नियोजन करावे.
पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. सुर्वे यांनी जिल्ह्यातील धरणे, पाणीसाठा, पडणारा पाऊस, करण्यात येणारा विसर्ग आणि हवामान विभागाने दिलेला इशारा याबाबत माहिती दिली.
अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये
प्रत्येक गावात तलाठी, ग्रामसेवकासह सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपापल्या मुख्यालयात राहणे बंधनकारक आहे. कोणत्याही परिस्थितीत मुख्यालय सोडू नये. आपत्कालीन मुख्यालय सोडल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.