कोल्हापूर : अत्यावश्यक या कारणाचा गैरवापर करत गुरुवारी संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशीही कोल्हापूरकर दिवसभर रस्त्यावर सुसाट होते. पोलिसांनाही न जुमानता त्यांना चुकवून जाणारी वाहने, दुकानांमध्ये खेटून उभे राहिलेले ग्राहक, बँकांबाहेर उडालेला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, मास्क हनुवटीला आणि रस्त्यांवर वर्दळ असे शहरातील एकूण चित्र होेते.दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य शासनाने १४ एप्रिलपासून राज्यात संचारबंदी लागू केली. नागरिकांचा एकमेकांशी संपर्क कमी येऊन कोरोनाची साखळी तुटावी हा त्या मागचा उद्देश होता. मात्र, शहरातील एकूण चित्र पाहता या उद्देशालाच हरताळ फासत कोल्हापूरकर सुसाट फिरत आहेत.
शासनाने अत्यावश्यक या कारणासाठी दिलेली सूट पुरेपूर वापरात आणत कोणत्याही नियमांचे पालन करणे आपल्याला बंधनकारक नाहीच, अशीच एकूण वर्तणूक होती. शासनाने संचारबंदीमध्ये अत्यावश्यक या नावाखाली मोजके व्यवसाय वगळता जवळपास सर्वच व्यवसाय व दुकानांना परवानगी दिली आहे. एकाच ओळीतील चार दुकाने सुरू तर दोन दुकाने बंद असे बाजारपेठेचे चित्र आहे.-