कोल्हापूर : अत्यावश्यक या कारणाचा गैरवापर करत गुरुवारी संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशीही कोल्हापूरकर दिवसभर रस्त्यावर सुसाट होते. पोलिसांनाही न जुमानता त्यांना चुकवून जाणारी वाहने, दुकानांमध्ये खेटून उभे राहिलेेले ग्राहक, बँकांबाहेर उडालेला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, मास्क हनुवटीला आणि रस्त्यांवर वर्दळ असे शहरातील एकूण चित्र होेते.
दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य शासनाने १४ एप्रिलपासून राज्यात संचारबंदी लागू केली. नागरिकांचा एकमेकांशी संपर्क कमी येऊन कोरोनाची साखळी तुटावी हा त्या मागचा उद्देश होता. मात्र, शहरातील एकूण चित्र पाहता या उद्देशालाच हरताळ फासत कोल्हापूरकर सुसाट फिरत आहेत. शासनाने अत्यावश्यक या कारणासाठी दिलेली सूट पुरेपूर वापरात आणत कोणत्याही नियमांचे पालन करणे आपल्याला बंधनकारक नाहीच, अशीच एकूण वर्तणूक होती. शासनाने संचारबंदीमध्ये अत्यावश्यक या नावाखाली मोजके व्यवसाय वगळता जवळपास सर्वच व्यवसाय व दुकानांना परवानगी दिली आहे. एकाच ओळीतील चार दुकाने सुरू तर दोन दुकाने बंद असे बाजारपेठेचे चित्र आहे.
--
अत्यावश्यक म्हणजे नेमके काय?
लोक वाट्टेल ती कारणे सांगून गावभर फिरत आहेत. त्यापैकी किती लोकांची कारणे ही खरेच अत्यावश्यकमध्ये मोडतात, ही कामे ते टाळू शकत होते का, याची तपासणी केली तर त्यातील फोलपणा जाणवेल. त्यामुळे अत्यावश्यकमधील सूट कमी करणे गरजेचे आहे.
---
कुठे आहे सोशल डिस्टन्सिंग?
शुक्रवारी दुपारी शाहूपुरी, राजारामपुरी, बिंदू, चौक, लक्ष्मीपुरी बाजारपेठ, साइक्स एक्सटेंशन, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन, उद्यमनगर, दसरा चौक या परिसरातील चित्र पाहिले असता एकाही दुकानात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले जात नव्हते. बँकांबाहेर लोकांच्या रांगा लागल्या होता. मास्क केवळ हनुवटीच्या सुरक्षेसाठी लावला होता. नाक आणि तोंड उघडेच होते. काही जणांनी तेदेखील लावण्याची तसदी घेतलेली नव्हती. ग्राहक खेटून दुकानांमध्ये व बाहेर उभे होते.
----
बसस्थानक, रेल्वेस्टेशनवर वेटिंग
मध्यवर्ती बसस्थानकात बऱ्यापैकी प्रवाशांची गर्दी होती. एरव्हीपेक्षा कमी प्रमाणत एसटीच्या फेऱ्या सुरू असल्या तरी एसटी भरेपर्यंत वाट पाहून गाड्या सोडल्या जात होत्या. तर रेल्वे स्थानकावर परराज्यातील मजूर बसून होते.
---
आम्ही काय पाप केलंय?
अन्य व्यवसाय करत असलेल्या एखाद्या दुकानात अत्यावश्यक सेवेतील वस्तू किंवा खाद्यपदार्थदेखील मिळत असेल तर ती दुकाने सुरू आहेत. मुख्य रस्त्यावर नसलेली बरीच दुकाने अर्धवट शटर उघडी ठेवून सुरू होती. केवळ कपड्यांची दुकाने, शोभेच्या वस्तूंची, ज्वेलरी, प्लास्टिकसह अन्य प्रकारच्या साहित्यांची विक्री करणारी अशी अगदीच वेगळा व्यवसाय करणारी ४० टक्के दुकाने बंद होती. एवढे सगळे सुरू ठेवायचेच होते तर आम्ही काय पाप केले होते, अशी प्रतिक्रिया एका व्यावसायिकाने दिली.
---
कारवाईत शिथिलता
एवढ्या मोठ्या संख्येने शहरात नागरिक फिरत असताना पोलिसांनीही कारवाईत शिथिलता आणावी लागली. विनाकारण फिरणारे लोकही अत्यावश्यकमधील अशी कारणे सांगायचे की त्यांच्यावर कारवाईही करता येत नाही. आम्ही किती म्हणून आणि काय म्हणून रोखणार, अशी त्यांची अडचण होती. अनेक लोक तर महापालिका कर्मचारी किंवा ट्रॅफिक पोलिसांनी शिट्टी मारली तरी थांबवायचा प्रयत्न केला तरी सुसाट गाडी पळवत होते.
---
फोटो फाइल स्वतंत्र