कोल्हापूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुरक्षा विचारात घेऊन मंगळवारपासून सर्व नागरिकांना कार्यालयीन प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला आहे. याबाबत प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी प्रवेश बंदी करणेबाबतचे आदेश दिले आहेत.
महापालिकेच्या संबंधित कामाबाबत गैरसोय होऊ नये, यासाठी नागरिकांना महानगरपालिकेची ऑनलाईन सेवा सुरू करण्याच्या सूचना प्रशासकांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
शहरात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही नागरिक विविध कामांसाठी महापालिकेत येत आहेत. त्यावेळी नागरिक शारीरिक अंतर ठेवत नाहीत. महानगरपालिकेचे कर्तव्य बजावत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून हा महापालिकेत प्रवेशास प्रतिबंध करण्यात आला आहे. नागरिकांनी आपल्या तक्रारी देण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या www.kolhapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर नागरिक तक्रार निवारण या लिंकवर क्लिक करून आपली नोंदणी करून आपल्या तक्रारी, सूचना करू शकतात किंवा टोल फ्री क्रमांक - १८०० २३३ १९१३ या नंबरवर कॉल करून आपल्या तक्रारी कार्यालयीन वेळेत नोंदवू शकतात.