कोल्हापूर : जवाहरनगर बी. वाॅर्ड येथील डी.पी. रोडवरच अतिक्रमण केल्याने परिसरातील चौदा कुटुंबांना जाण्या-येण्यासाठी रस्ता नाही. यामुळे येथील नागरिकांचे विशेषकरून वयोवृद्ध व लहान मुलांची कुचंबणा होत असून, महापालिकेने तात्काळ लक्ष घालून रस्ता खुला करून द्यावा, अशी मागणी येथील नागरिकांनी आयुक्तांकडे केली आहे. जवाहरनगर येथील गट क्रमांक ६२६/४ मधून १९८५ पासून गट क्रमांक ६२६ मधील नागरिकांसाठी वहिवाट सुरू होती. या वहिवाटेच्या जागेत नाईक परिवाराकडून वैयक्तिक कुंपण करून रस्ता अडविण्यात आला आहे. यामुळे गट क्रमांक ६२६ मधील नागरिकांना जाण्या-येण्यासाठी रस्ताच नाही. या परिसरात चौदा कुटुंबे राहतात, या कुटुंबातील वयाेवृद्ध व लहान मुलांना त्याचा त्रास होत आहे. या अतिक्रमणावर कारवाई करून रस्ता खुला करून द्यावा, अशी मागणी मारुती पोवार, शोभा पोवार, सुशीला पोवार, अंजना मोहिते, दिलीप काळे, दिलीप मोरे, गिरीश पोळ, राहुल शिंदे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
फोटो ओळी :
जवाहरनगर बी. वॉर्ड येथे डी.पी. रोडवरच तार मारून अतिक्रमण केल्याने परिसरातील नागरिकांची कुचंबणा होत आहे. (फोटो-२८०२२०२१-कोल-जवाहरनगर)