कोल्हापूर : महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसडा मारून भरधाव वेगाने पळ काढणाऱ्या दुचाकीस्वार चोरट्याला नागरिकांनी थरारक पाठलाग करून पकडले. त्याला बेदम चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना नागोबा मंदिर ते नागाळा कमान या आतील रस्त्यावर बुधवारी दुपारी घडली. पंकज बाबासाहेब पाटील (वय २१, रा. वडणगे पाडळी, ता. करवीर) असे त्या चोरट्याचे नाव आहे. त्याची दुचाकीही जप्त करण्यात आली.शहरात गेले दोन महिने चेन स्नॅचिंगचे गुन्हे मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत, त्याच पार्श्वभूमीवर शहरात बुधवारी पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी केली.
दरम्यान, वैशाली विजय लोखंडे (वय २७, रा. शाहूनगर, कसबा बावडा, मूळ रा. कनाननगर) ही मोलमजुरी करणारी महिला नागाळा पार्क परिसरातील नागोबा मंदिरकडून कमानीकडे पायी जात होत्या. त्याचवेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे मणीमंगळसूत्र हिसडा मारून चोरले.
महिलेने आरडाओरडा केला. चोरट्याने भरधाव वेगाने दुचाकीवरून पळ काढला. परिसरातील नागरिकांनी त्याचा पाठलाग केला. पाठलाग सुरू असल्याचे पाहून गोंधळलेला चोरट्याची दुचाकी रस्त्यावर घसरल्याने तो खाली पडला. पाठोपाठ नागरिकांनी त्याला बेदम चोप दिला.
घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार प्रकाश भंडारे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी येऊन त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता चोरलेले मंगळसूत्र त्याच्या खिशात सापडले. नागरिकांनी चोपल्यामुळे व दुचाकीवरून पडल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर, हाता-पायाला जखमा झाल्या होत्या. त्याने आपले नाव पंकज पाटील असल्याचे सांगितले, त्याला अटक करण्यात आली आहे.चेन स्नॅचिंगचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यताशहरात गेल्या दोन महिन्यांत कनानगर, राजारामपुरी, सानेगुरुजी वसाहत, रिंगरोड आदी परिसरात महिलांच्या अंगावरील दागिने हिसडा मारून दुचाकीवरून भरधाव वेगाने पळून गेलेल्या अनेक घटना घडल्या आहेत. पंकज पाटील याला पकडल्यामुळे त्याच्याकडून व त्याच्या साथीदारांच्या केलेल्या अनेक चेन स्नॅचिंगच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.चोरटा उच्चशिक्षीतपंकज पाटील हा उच्चशिक्षित आहे. तो सध्या बी, एस्सी. (ॲग्री)च्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे, तो चांगल्या घराण्यातील असून तोंडावर मास्क बांधून चैनीसाठी चेन स्नॅचिंग करीत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्या आणखी एका साथीदाराला रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले असून त्या दोघांकडे चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.