कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर ठरावीक मुदतीत दुसरा डोस घेणे आवश्यक असताना तो मिळत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. यासाठी लसीकरण केंद्रांवर फेऱ्या मारणे सुरू असून, आता प्रशासनाने यासाठी वेगळी व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे. ज्यांनी खासगी रुग्णालयामध्ये लस घेतली आहे ते नागरिकही त्या त्या रुग्णालयांच्या मागे लस देण्यासाठी रोज तगादा लावत आहेत.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर्स आणि कर्मचारी यांना पहिल्या टप्प्यात, फ्रंटलाइन वर्कर आणि पंचायत राज व्यवस्थेतील अधिकारी, कर्मचारी यांना दुसऱ्या टप्प्यात, ज्येष्ठ नागरिक यांना तिसऱ्या टप्प्यात तर ४५ वर्षांवरील नागरिकांना चौथ्या टप्प्यात लसीकरण सुरू करण्यात आले.
यातील कोव्हॅक्सिनचा डोस ज्यांनी घेतला आहे त्यांना २८ ते ४५ दिवसांमध्ये दुसरा डोस घेणे बंधनकारक आहे, तर कोविशिल्डचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे अशांनी ४५ ते ५६ दिवसांमध्ये दुसरा डोस घेणे बंधकारक आहे. पहिला डोस घेतल्यानंतर काही प्रमाणात प्रतिकारशक्ती वाढते. परंतु १०० टक्के प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी दुसरा डोस अत्यावश्यक असतो.
परंतु कोल्हापूर जिल्ह्यात गेले तीन दिवस लस आलेली नाही. गेल्या पंधरवड्यापासून लसींचा खेळखंडोबा सुरू असून, यामुळे सगळ्यात हवालदिल झाले आहेत ते पहिला डोस घेतलेले नागरिक. दुसऱ्या डोसची मुदत संपत आली तरी तो मिळत नसल्याने अशा नागरिकांचा धीर सुटत चालला आहे. रोज चौकशी करायची, लसीकरण केंद्रांवर जायचे आणि लस नाही म्हणून, गर्दी प्रचंड आहे म्हणून परत यायचे असे अनेकांच्या बाबतीत सुरू आहे.
चौकट
ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल
या सगळ्यात ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. एकतर वय जास्त झाले आहे म्हणून बाहेर जायचे नाही. गर्दीतच पहिला डोस घेतला तर आता दुसरा डोस मिळत नाही, अशा कात्रीत ही मंडळी अडकली आहेत. एकदा का दोन डोस घेतले की, आपल्याला कोरोना होणार नाही, हा आशावाद त्यांना प्रेरणा देऊ शकतो. मात्र, दुसरा डोसच उपलब्ध होत नसल्याने पुन्हा नव्याने डोस घ्यावा लागण्याची भीती त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे.
चौकट
हे करता येईल
ज्यांना पहिला डोस दिला आहे, अशांना लस उपलब्ध झाल्यानंतर मेसेज पाठवायचे. त्यांनाच केंद्रांवर दुसरी रांग करून लसीकरणासाठी प्राधान्य द्यायचे. यासाठी वेगळे नियोजन करून पहिला डोस दिलेल्या नागरिकांना दिलासा देता येणे शक्य आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदेने यासाठी नियोजन करण्याची गरज आहे.
प्राधान्याने दुसरा डोसच द्या
जिल्हा प्रशासनाने सर्व वयोगटातील नागरिकांसाठी लस देण्याऐवजी ज्यांचा पहिला डोस झाला आहे, त्यांना तातडीने दुसरा डोस कसा मुदतीत मिळेल, यासाठीचे नियोजन करणे आवश्यक आहे.