कोल्हापूर : महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्यावतीने पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांचे बचाव कार्य बुधवारी सकाळी सात वाजलेपासून पुन्हा सुरू करण्यात आले आहे. सकाळी शाहूपुरी कुंभार गल्ली, रिलायन्स मॉल, मुक्त सैनिक वसाहत, डायमंड हॉस्पिटल, हरीपूजापूरम नगर, सन सिटी, वन्डर इलेवन, रमणमळा या परिसरातील अनेक नागरिकांना सक्तीने घरातून बाहेर काढण्यात आले.
प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मुक्त सैनिक वसाहत, महावीर कॉलेज, पंचगंगा रोड येथे करण्यात येत असलेल्या रेक्यू ऑपरेशनची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई उपस्थित होते. बलकवडे यांनी पुराच्या पाण्यातून बाहेर काढलेल्या नागरिकांची विचारपूस केली. तसेच जे कोणी अजून घरात वरच्या मजल्यावर आहेत त्यांना सक्तीने बाहेर काढण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. सकाळी मुक्त सैनिक वसाहत येथे मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, शाहुपुरी येथे उप-आयुक्त निखिल मोरे व सहायक आयुक्त विनायक औंधकर, उप-शहर अभियंता बाबुराव दबडे, महावीर कॉलेज येथे उप-आयुक्त रवींद्र आडसुळ, उप-शहर अभियंता हर्षजित घाटगे, पंचगंगा तालीम येथे उप-आयुक्त शिल्पा दरेकर, उप-शहर अभियंता नारायण भोसले यांनी अग्निशमन विभागाच्या जवानांच्या सहाय्याने केले.
यानंतर प्रशासक बलकवडे यांनी के.एम.सी. कॉलेज, रमणमळा धान्य गोडाऊन, बावडा येथे नागरिकांना स्थलांतरित केलेल्या निवारा केंद्रास भेट घेतली. या ठिकाणी सुरू असलेल्या वैद्यकीय तपासणीची त्यांनी पाहणी केली. निवारा केंद्रातील नागरिकांना सर्व सुविधा व्यवस्थित मिळतात का याची विचारणा केंद्रातील नागरिकांना केली. यावेळी नागरिकांनी निवारा केंद्रात सर्व व्यवस्था चांगली असल्याचे सांगितले.