इचलकरंजी : शहरात भटक्या डुकरांचा वावर दिवसेंदिवस वाढतच आहे. नागरिकांनी भटक्या डुकरांचा बंदोबस्त करण्याबाबत नगरपालिकेकडे निवेदने, आंदोलनाद्वारे वारंवार मागणी केली. मात्र, पालिकेकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. आयजीएम हॉस्पिटल व कर्मचारी निवासस्थान परिसरात डुकरांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
शहरातील विविध भागांत भटक्या डुकरांचा वावर वाढला असून गल्लीबोळ, तसेच रस्त्यावर मुक्तपणे ही डुकरे फिरत असतात. त्यामुळे अपघातास निमंत्रण दिले जात आहे. अनेक भागांत कचरा वेळेवर उठाव होत नसल्याने डुकरे त्याठिकाणी ठाण मांडून राहतात. कचऱ्यात डुकरे हैदोस घालतात. त्यामुळे तो कचरा रस्त्यावर सर्वत्र पसरला जातो. त्यामुळे आणखीच घाण वाढत आहे.
सध्या शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी महामारी अद्याप गेलेली नाही. अशातच डुकरांचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिकांना आरोग्याची अधिकच काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. डुकरांचा बंदोबस्त करावा यासाठी पालिकेत अनेकवेळा वादंगही निर्माण झाले होते. आंदोलकांनी मृत डुक्कर नगरपालिकेत नेले होते. तीव्र आंदोलने, वारंवार चर्चा करूनही या विषयावर योग्य व कायमस्वरूपी तोडगा निघत नसल्यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कर्मचाऱ्यांसमोर दुहेरी संकट
आयजीएम हॉस्पिटल परिसरातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून सध्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्याचे काम सुरू आहे, तसेच हे हॉस्पिटल कोविड सेंटर म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांची दिवसरात्र सेवा करावी लागत आहे, तर घरी गेल्यावर परिसरातील डुकरांपासून होणारा त्रास सहन करावा लागतो. यामुळे इतरांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.
फोटो ओळी
इचलकरंजी : आयजीएम हॉस्पिटल येथील कर्मचारी निवासस्थान परिसरामध्ये मोकाट डुकरांचा सुळसुळाट झालेला आहे. त्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
२८ आयसीएच पीग