विश्वास पाटीलआनंदी जीवनाची जगाची व्याख्या काही असली तरी कोल्हापूरची एक स्वत:ची व्याख्या आहे आणि त्यानुसारच कोल्हापूर कशाचीही फिकीर न करता जगत आले आहे. त्याच्या जगण्यातला रसरशीतपणा हाच त्याच्या आनंदनिर्मितीचा मुख्य प्रेरणास्रोत आहे. कारकार वाजणारे कोल्हापुरी पायताण, झणझणीत मिसळ, डुईवरचा तो तुरेबाज लहरी फेटा, अरे ला कारे म्हणण्याचा निडर स्वभाव, कोणतीही गोष्ट आवडली तर त्याला खांद्यावर घेऊन नाचण्याचा दिलदारपणा.. आणि जे आवडले नाही ते पायाखाली तुडवण्याची हिंमत, अशी किती म्हणून कोल्हापुरी बाजाची प्रतीके सांगावीत. ही सगळी त्याच्या लई भारी आनंदाशी, जगण्याची जोडलेलीच आहेत बरे..काळाची पावलं ओळखून सारीच शहरे बदलली, तसे कोल्हापूरही जरूर बदलले आहे; परंतु त्याच्या जगण्याचा मूळ बाज जो आहे तो मात्र त्याने अजूनही सोडलेला नाही.. बदलू दिलेला नाही. आनंदी कोल्हापूरची व्याख्या त्यातच लपली आहे.संयुक्त राष्ट्राने जगातील सर्वांत आनंदी देशाची यादी मागच्या मार्चमध्ये जाहीर केली. त्यानुसार ‘फिनलँड’ हा देश जगातील सर्वांत सुखी आणि आनंदी देश ठरला. या यादीत भारत १३६ व्या स्थानी आहे. यात लोकांच्या आनंदाचे, आर्थिक आणि सामाजिक, व्यक्तिगत स्वातंत्र्य, त्यांचे स्वास्थ्य, देशांतर्गत उत्पादन अशा विविध निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. हे निकष काही असले तरी भारतात कुण्या एखाद्याने अभ्यासकाने कोणते शहर जास्त आनंदी आहे याचा शोध घेतला तर त्याला कोल्हापूरच्या आनंदी जगण्याची नक्कीच भुरळ पडेल. कोल्हापूरचा आनंद हा फारच छोट्या-छोट्या गोष्टींतून व्यक्त होत आला आहे..एका हाकेत रेडकू पळवण्याची स्पर्धा तुम्हाला जगाच्या पाठीवर फक्त कोल्हापुरातच पाहायला मिळेल. तुम्ही म्हणाल की यात कसला आलाय आनंद, त्यांनी काय वाघ पळवलाय का? पण कोल्हापूरचे हेच तर महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. बघा तो कसा या गोष्टीचा विचार करतो.. कोल्हापूर आज कितीही पुढारले, विकसित झाले तरी या शहराचा मूळ ढंग, संस्कृती ही कृषी संस्कृतीशी नाते सांगणारी आहे. या शहराचे अर्थकारणही याच कृषी संस्कृतीशी अगोदर घट्ट झाले आणि त्यातून सहकार आला.. औद्योगिकीकीरण झाले आणखी बरेच काही आले आणि कोल्हापूर विकासाचे टप्पे पार करीत राहिले; परंतु या शहराने आपली मूळ संस्कृती अजूनही टिकवून ठेवली आहे आणि हीच या शहराची खरी ओळख आहे. तोच त्याच्या आनंदी जीवनाचा झरा आहे.एका हाकेत रेडकू पळवणे हे सोपे काम नाही. एका हाकेत तुमच्या रक्ता-मांसाचा माणूसही तुम्हाला प्रतिसाद देत नाही.. तिथे तर हा मुका जीव तुम्ही नुसती हाक दिल्यावर जीव पायात घेऊन तुमच्या मोटारसायकलीच्या वेगाने घोड्यासारखा पळत सुटतो. ही हाकेला प्रतिसाद देण्याची ताकद जशी प्राण्यांत आहे, तशीच ती कोल्हापूरच्या माणसांतही आहे. जो रेडकू पळवतो, त्याने त्याला आधी जीव लावलेला असतो. ही माणसाला जीव लावण्याची कला हा कोल्हापूरचा अंगभूत गुण आहे. एखाद्याच्या मदतीला धावून जाणे हा जर एकच निकष कुणी लावून शहरांचे मोजमाप केले, तर कोल्हापूर हे जगात सगळ्यांना मागे टाकेल. चॅलेंज आहे आपले. या शहराचा तो डीएनए आहे भाऊ... एक साधे उदाहरण देतो.२६ जानेवारी २०१८ रोजी कोकणात पर्यटनासाठी गेलेली प्रवासी कार परत येताना कोल्हापुरातील शिवाजी पुलावरून नदीत कोसळली. पहाटेची वेळ... कुडकुडायला लावणारी थंडी होती; परंतु अपघात झालाय आणि मदतीची गरज आहे म्हटल्यावर अंगावरील चादरी फेकून दिल्या आणि बुधवारपेठ परिसरातील शंभर-दीडशे तरुण तिथे पोहोचले. नदीत उड्या घेतल्या व जेवढ्या लोकांना वाचवता येईल तेवढ्यांना बाहेर काढले.काट्याकुट्याची फिकीर केली नाही. काहींचे पाय रक्तबंबाळ झाले; परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याचा जीव वाचवण्यास प्राधान्य दिले. हे आहे माझे कोल्हापूर. कारमधील सर्व लोक पुण्यातील होते. इतर कुणाला त्या थंडीत कुणी पाच हजार रुपये देतो म्हटले असते तरी गार पाण्यात कुणी उडी घेतली नसती; परंतु जेव्हा जेव्हा मदतीची, माणुसकीची हाक ऐकू आली तेव्हा तेव्हा कोल्हापूर सगळ्यात पुढे धावले आहे. ते केले म्हणून माझे कुणी कौतुक करावे, पाठीवर थाप मारावी, अशीही त्याला कधीच अपेक्षा नसते. ‘नेकी कर और दर्या में डाल’ अशीच त्याची काहीशी वृत्ती. हे एका अपघातापुरते कधीच नसते. जेव्हा केव्हा संकट येईल तेव्हा कोल्हापूरकर मदतीला धावला आहे.कोल्हापूरने मागच्या चार वर्षांत दोन महापूर पाहिले. हजारो पूरग्रस्तांचे स्थलांतर झाले. कोल्हापूरने त्यांच्यासाठी काय-काय केले नाही.. कुणी धान्य दिले, कुणी कपडे दिले, कुणी औषधी दिली, कुणी अंथरूण-पांघरूण दिले. जे जे माझ्याजवळ आहे त्यातील मूठभर घरात ठेवून सगळे लोकांच्या मुखात घालण्यासाठी लोक धावले. कोल्हापूरच्या आजूबाजूच्या गावांतून तर ट्रॉलीमधून दुधाचे कॅन भरून येत होते आणि चौकात उभे राहून लोकांना वाटत होते. कोल्हापूर हॉटेल मालक संघाच्या पुढाकाराने धैर्यप्रसाद हॉलमध्ये तब्बल महिनाभर सेंट्रल किचन सुरू होते. उत्तम जेवणाची पाकिटे करून सगळ्यांना वाटण्यात येत होती. ज्यांनी स्वत:च्या घरात कधी स्वत:हून पाण्याचा तांब्या भरून घेतला नाही असे लोक तिथे कांदा चिरत होते, कोणी आचाऱ्याच्या हाताखाली मदतीला थांबले होते. हे आहे कोल्हापूरचे खरे स्पिरिट. मदतीला धावताना इथला मर्सिडिजवालाही पुढे असतो आणि त्याच्या पुढे कोल्हापूरचा सायकलवाला, रिक्षावालाही असतो. महापूर गेल्यावर दोन वर्षे कोरोनाने झोडपून काढले. या काळात प्रत्येकाला मरणाची भीती होती; परंतु कोल्हापूर थांबले नाही. त्याने रस्त्यावरील माणसाला जेवणाची पाकिटे पोहोच केली. कुत्र्या-मांजरांना जेऊ-खाऊ घातले. कोरोनाच्या भीतीने कोल्हापूरचा माणूस घरात बसला नाही. जे त्याला शक्य आहे ते तो करीत राहिला.नात्यातील माणसाचे अंत्यसंस्कार करण्यासही कुणी तयार नव्हतं तेव्हा बैतुलमाल कमिटीचे मुस्लिम समाजातील खंदे वीर रस्त्यावर उतरले आणि त्यांनी अनेक दिवस हे माणुसकीचे नाते घट्ट करणारं हे काम केलं. अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील की, त्यांनी कोल्हापूरचे माणूसपण मोठं केलं आहे.. सुख-दु:खाच्या प्रसंगात धावून जाण्यात कोल्हापुरी माणसाला कमालीचा आनंद वाटला आहे. म्हणूनच मला वाटतं संयुक्त राष्ट्राने कधीकाळी आनंदी देशाचा जसा अभ्यास केला तसा आनंदी शहराचा केला, तर त्यात कोल्हापूर जगाच्या स्पर्धेत सगळ्यात पुढं असेल.कोल्हापूरच्या जगण्यातील असे अनेक पैलू आहेत. त्याला जिव्हाळा जपण्यात कमालीचा आनंद वाटतो. बघा ना, त्याला कुणीतरी सांगितलं, भावा पुढच्या शुक्रवारी आमच्या गावची म्हाई आहे आणि जेवायला यायला लागतंय.. तर तो कॅलेंडरवर लिहून ठेवणार.. ते गाव कोल्हापूरपासून पार पाच-पन्नास किलोमीटर असलं तरी मोटारसायकलवरून तिब्बल सीट बसून ते तिकडे जेवायला जाणार म्हणजे जाणार.. बरं एवढ्या लांब जाऊनही दोन मटणाच्या फोडी आणि पातळ रस्सा खाण्यात त्याला जो आनंद वाटत आलाय त्याची तोड फाईव्ह स्टार हॉटेलमधल्या जेवणालाही नाही बरं...मित्राच्या लग्नात दंगामस्ती करावी तर ती कोल्हापूरनेच. वरातीत नाचण्यात तर सगळ्यात पुढं... कोल्हापूरचा माणूस दुसऱ्याच्या आनंदात समरसून सहभागी होतो, तसाच तो दु:खात, अडचणीतही मदतीला धावून जातो. तितक्याच टोकाचे तो शत्रूत्वही करत आलाय.. म्हणजे एकमेकांकडं नुसतं रागानं बघितलं, लई काखा फुगवून चालतंय रे हे.. या कारणावरूनही कोल्हापुरात कैक खून झाले आहेत. त्याला एखादी गोष्ट आवडली तर खांद्यावर घेऊन नाचणार.. कुस्तीत कोल्हापूरच्या मल्लांचा पराभव केल्यावरही सतपाल, कर्तारसिंग, हरिश्चंद्र बिराजदार अशा पहिलवानांची हत्तीवरून मिरवणूक काढण्याचं मोठं मन जपावं तर ते कोल्हापूरनेच.कोल्हापूरच्या माणसाला कायम शड्डू मारायला म्हणजेच आव्हान द्यायला आवडतं. त्याला कुणी आव्हान दिलेलं अजिबात आवडत नाही तसं झालं की मग कोल्हापूरकर पेटून उठलाच म्हणून समजा.. राजकारणात तर हे अनेकदा खरं ठरलंय.. हातकणंगले लोकसभेची १९६७ ची लढत अशीच गाजली होती. दत्तक प्रकरणातील कोल्हापूरच्या जनभावनेचे प्रतिबिंब या निवडणुकीत उमटले आणि विजयमाला राणी सरकार यांनी कर्नल एसपीपी थोरात यांचा पराभव केला. थोरात त्यावेळी जिंकले असते तर देशाचे संरक्षणमंत्री झाले असते. परंतु, कोल्हापूरने त्याची फिकीर केली नाही. त्याची पुनरावृत्ती २००९ मध्ये कोल्हापूर लोकसभेच्या निवडणुकीत झाली. दिवंगत नेते सदाशिवराव मंडलिक यांच्या रूपाने जेव्हा कोल्हापूरला चॅलेंज दिले गेलंय, अशी जनभावना झाली तेव्हा वयाच्या पंचाहत्तरीतही लोकांनी मंडलिक यांना गुलाल लावला व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा अप्रत्यक्ष पराभव केला.यंदा कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीतही कोल्हापूरच्या सद्सदविवेक भावनेला कुणीतरी डिवचण्याचा प्रयत्न केला तेव्हा वारे परतण्याची मर्दुमकी कोल्हापूरने दाखवून दिली. कोल्हापूरने अशी वेगवेगळ्या टप्प्यावर अनेकांची अक्षरश: जिरवली आहे. टोलच्या आंदोलनातही असेच घडले.दोन्ही सरकारने आणि एक बलाढ्य कंपनी विरोधात असतानाही कोल्हापूरचा माणूस पायताण हातात घेऊनच रस्त्यावर उतरला आणि केंद्र सरकारचे खासगीकरणाचे धोरणही त्याने मोडून दाखविले. एकदा त्याने एक भूमिका घेतली की, त्यातून माघार नाही बघा.. मधला मार्ग तर अजिबातच नाही.. काय असेल ते खटक्यावर बॉट अन् जाग्यावर पलटीच.. बाकीचे काय आम्हाला माहीत नाही.. टोल बंद झाल्यावर रस्त्यांची दुरुस्तीही महापालिकेला जमणार नाही, अशी भीती तेव्हा व्यक्त झाली व ती आजही आहेच. परंतु बघू जवाचं तवा.. पहिला तो टोल हद्दपार करणार यासाठी सामान्य माणूस पेटून उठला आणि तो जिंकलाही.. नागरी प्रश्न असो की, अन्य कोणत्याही बाबतीतला अन्याय असो, त्याच्याविरोधात पेटून उठण्याची धमक आजही या शहराने सांभाळून ठेवली आहे. म्हणूनच हे शहर आजही कायम जिवंत आहे.. त्याच्या धमण्यातील रक्त कायम सळसळत असतं.. मैत्री, मदत किंवा शत्रुत्व करण्यात कोल्हापूरचा हात कधीच आखडता नसतो.कोल्हापूरचा माणूस प्रचंड हौशी आहे. येथे दिवाळी पाडव्याला म्हशींचा रोड शो होताे. काय एकेक म्हैस सजवलेली असते म्हणा... मिस वर्ल्डसारखा थाटमाट असतो. त्याची म्हैस ही कोल्हापूरच्या माणसाच्या दृष्टीने मिस वर्ल्डच असते. इथला रिक्षावाला एक अवलियाच आहे. तोदेखील राज्यात कुठंही रिक्षा सौंदर्य स्पर्धा असेल, तिथे हमखास बक्षीस मिळविणारच. तो तितकाच प्रामाणिकही. रिक्षात कुणाची बॅग विसरली आणि त्यातील पैसे घेऊन त्याने आपल्या संसाराला लावलेत, असे उदाहरण कोल्हापुरात नाही. रात्री-अपरात्री कुणीही एकटी-दुकटी महिला त्याच्या रिक्षात बसली आणि दादा... अमूक ठिकाणी चला म्हटली की, तो तिला दारात सोडून कधीच परत येणार नाही. घरात दार उघडून ती आपली बहीण सुरक्षित घरात जाईपर्यंत त्याची जबाबदारी संपत नाही. सामाजिक प्रश्न तयार झाला तर त्यातही भागीदारी करायला कोल्हापूरचा रिक्षावाला पुढं..स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिनी चौकाचौकात जिलेबी स्टॉलचा घमघमाट ही कोल्हापूरची खासियत. त्याला प्रचंड देशाभिमान. मॅच फुटबॉलची असो की, क्रिकेटची.. जिंकल्यावर फटाक्यांची आतषबाजी अन् मोटारसायकलच्या पुंगळ्या काढून तिरंगा हातात घेऊन फेरी मारण्यात त्याला किती म्हणून आनंद सांगू.. चित्रपट अभिनेत्यांवरही त्याचे असेच प्रेम. स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करून राज कपूर यांचा पुतळा उभा करावा तो कोल्हापूरच्या माणसानेच. एखादा खेळाडू पदक जिंकून आला की, त्याची मिरवणूक काढण्यातही कोल्हापूर कायमच पुढे. दुसऱ्याच्या यशात आनंद मानण्यात त्याचे कौतुक करावं तर ते कोल्हापूरनेच. वृत्तपत्रात साधी चार ओळीची अमक्याला मदतीची गरज आहे म्हणून बातमी आली तर मदतीचा ओघ समजा झालाच सुरू.ही मदत सामाजिक कामांना, गोरगरिबांना झाली आहे तशीच ती संस्थात्मक पातळीवरही झाली आहे. कोरोनाकाळात जेव्हा उत्तरप्रदेश, बिहार, झारखंडमधील मजूर त्यांच्या गावी परतले तेव्हा त्यांच्यासाठी खास रेल्वेची सोय तर केलीच; परंतु त्यांना रेल्वेत खायला अन्नाच्या पाकिटापासून ते पाण्याच्या बाटल्या व औषधाचीही सोय कोल्हापूरने केली. देशभरात अशा स्थलांतरित मजुरांची किती वणवण झाली हे सर्वांनीच अनुभवले आहे. परंतु, कोल्हापूरचा अनुभव जगात भारी होता. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, येथील बालकल्याण संकुलास वर्षाला किमान एक-दीड कोटींची मदत होते. दर महिन्याला कोण धान्याची पोती आणून टाकते, गोकुळ-वारणासारखे संघ रोज पाच-पंचवीस लिटर दूध कित्येक वर्षे देताहेत. त्याची कुठेही जाहिरात नाही. राजकारणात चांगले लोक यायला हवेत म्हणूनही कोल्हापूरने अनेकांना मदत केली. शेतकऱ्यांच्या भल्याची चळवळ करतात, म्हणून राजू शेट्टी यांच्या पाच निवडणुकींना लोकांनी एक व्होट आणि एक नोट दिली. निवडणूक होऊन चळवळीला उपयोगी यावेत इतके पैसे त्यांना लोकांकडून मिळत होते, मिळत आहेत. पैशाशिवायही कोल्हापूरने महाराष्ट्राला किती चळवळी दिल्या.देवदासी प्रथा निर्मूलन, गुटखा बंदी, मूर्तिदान, निर्माल्य दानापासून रंकाळा आणि पंचगंगा प्रदूषण मुक्तीपर्यंत कितीतरी चळवळी सांगता येतील. कोणतेही काम सरकारचे आहे म्हणून कोल्हापूरकर कधीच हातावर हात बांधून बसलेले नाही. त्याने आपली भागीदारी अगोदर केली आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या पुण्याईने कोल्हापूरच्या विकासाचा पाया घातला. त्यामुळे त्या राजाबद्दल जनतेच्या मनात कमालीची कृतज्ञतेची भावना आहे. ही जशी राजाबद्दल कृतज्ञता आहे, तशीच कोल्हापूरचे पहिले आयुक्त म्हणून द्वारकानाथ कपूर यांचेही नाव कोल्हापूर अजून काढतंय. जे चांगलं आहे त्याला पुढे घेऊन जाण्याचा कोल्हापूरच्या मातीचा हा वेगळाच गुण आहे.कोल्हापूरचे वातावरण चांगले आहे. पाऊस चांगला.. थंडीही सोसणारी.. उन्हाळाही झेपणारा.. कोल्हापूरचा क्राईम रेटही तुलनेत कमीच. सामाजिक व जातीय ताणतणाव फारसे नाहीत. नद्यांनी समृद्ध असणारा जिल्हा. दरडोई उत्पन्नात देशाने दखल घ्यावी असा.. त्याची ओळख फक्त तांबडा-पांढऱ्या रस्स्यापुरतीच मर्यादित राहिलेली नाही. पूर्वी ब्रिटिशांचे राज्य नाही, असा एकही देश या पृथ्वीवर नाही, असे म्हटले जायचे. कोल्हापूरचे तसेच आहे. इथला तरुण नोकरी, व्यवसायानिमित्त स्थायिक झालेला नाही, असा एकही देश शिल्लक राहिलेला नाही. म्हणजे रांगडं कोल्हापूर शिक्षणात, खेळात, चित्रपटात, गुणवत्तेतही मागे नाही. त्याच्याकडे कमालीची सृजनशीलता आहे. तो प्रचंड आशावादी आहे.रडगाणं कोल्हापूरला कधीच मान्य नाही. जे आपल्याकडे नाही ते मिळवण्याची जिद्द त्याच्या दंडात आहे. असं हे आमचं कोल्हापूर.. म्हणूनच अधिकारी राज्य शासनाचा असो की केंद्र शासनाचा तो एकदा कोल्हापुरात आला की, या शहराच्या प्रेमातच पडतो. इथली सामाजिक वीण, मदतीला धाऊन जाण्याची वृत्ती जगाला आवडते. गणेशोत्सवात नाचणारा तरुण मोहरमचे पीरपंजे मिरवणुकीतही पुढं असतो. ईदला दहा-वीस घरांतून शीरखुर्म्याच्या किटल्या भरून इतर समाजबांधवांकडे पोहोच होतात, असे हे कोल्हापूर.. जीवाला जीव देणारं... रांडंच्या या शिवीलाही प्रेमाची हाक बनविणारे.. गल्लीच्या कोपऱ्याला उभे राहून बापाच्या नावाने दोस्ताला हाळी देणारं... स्वत:ची रांगडी भाषा.. संस्कृती जपणारं.. जोपासणारं आणि म्हणूनच आनंदी, हसरं कोल्हापूर... ज्याचा एक कोल्हापुरी म्हणून सर्वांनाच गर्व वाटणारं... आम्ही कोल्हापुरी.. लई भारी.. असं जगाला ओरडून सांगणारं...(लेखक, ‘लोकमत’ कोल्हापूरचे उप वृत्त संपादक आहेत.)
जिंदादिल कोल्हापूर, आनंदी जगते पुरेपुर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 5:58 PM