रुक्मिणीनगर ते निरामय हॉस्पिटलपर्यंतचा (वायचळ पथ ते रुईकर कॉलनी मार्गाला जोडणारा मार्ग) एक किलोमीटर अंतराचा हा रस्ता २० फुटी आहे. या नगरातील हा अंतर्गत रस्ता आहे. मात्र, तावडे हॉटेल, मार्केट यार्डकडून येणारे वाहनधारक लिशा हॉटेल चौक, महाडिक वसाहत आणि ताराराणी चौकातील सिग्नल चुकविण्यासाठी, तर टेंबलाईवाडी उड्डाणपूल, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, सीबीएसकडून येणारे सर्रास वाहनधारक हे शॉर्टकट म्हणून रुक्मिणीनगरातील मार्गाचा वापर करतात. त्यात दुचाकी, चारचाकी, स्कूलबस, मालवाहतुकीचे टेम्पो, अवजड वाहनांचा समावेश आहे. या मार्गावर सकाळी साडेसात ते साडेनऊ आणि सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेआठ यावेळेत वाहतुकीची कोंडी निर्माण होते. त्याचा त्रास होत असल्याने येथील नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यांना येथील वाहतुकीला शिस्त लावण्याच्या मागणीची निवेदने दिली. त्यावर गेल्या पाच महिन्यांपूर्वी रक्मिणीनगरातून उड्डाणपुलाकडे जाण्यासाठी हा मार्ग वन-वे केला. त्यासह याठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचारी नियुक्त केला. मात्र, वाहनधारक हे वाहतूक पोलीस कर्मचारी त्याठिकाणी असेपर्यंतच वन-वे, यु-टर्न मनाई या नियमांचे पालन करतात. संबंधित कर्मचारी नसला की, वाहनधारक नियम धाब्यावर बसवून वाहने दामटतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन त्याचा येथील नागरिकांना त्रास होत आहे. (पूर्वार्ध)
चौकट
घरातून बाहेर पडणे मुश्कील
रुक्मिणीनगरमधील या मार्गालगत सध्या सुमारे पाचशे नागरिक राहतात. उड्डाणपूल होण्यापूर्वी या मार्गावर परिसरातील नागरिकांशिवाय क्वचितच बाहेरील वाहने यायची. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक मॉर्निंग, इव्हनिंग वॉक करायचे. मात्र, आता रोज पाच तास होणारी वाहतुकीची कोंडी, सुसाटपणे जाणाऱ्या वाहनांमुळे येथील नागरिकांना घरातून बाहेर पडणे, तेथून चालत जाणे मुश्किलीचे झाले आहे.