कसबा तारळेत खरेदीसाठी नागरिकांची झुंबड
कसबा तारळे : कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अखेर आज, शनिवारी रात्रीपासून आठ दिवसांसाठी कडक लॉकडाऊन घेण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर कसबा तारळे बाजारपेठत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची अक्षरश: झुंबड उडाली होती.
शहरासह ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना महामारीचा विळखा घट्ट होत चालला आहे. बाधित रुग्णांच्या वाढीबरोबरच मृत्यूचे प्रमाणही लक्षणीय आहे. कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी सर्वच पातळीवर उपाययोजना राबविण्यात येत असल्या तरी त्याला अपेक्षित यश मिळत नव्हते. परिणामी आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला आहे.
या काळात फक्त मेडिकल, शेतीसेवा केंद्र व दूध वितरणालाच परवानगी असून अन्य सर्वच आस्थापना बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी किराणा, भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी केल्याने मुख्य बाजारपेठेला जत्रेचे स्वरूप आले होते. अकरा वाजल्यानंतरही काही दुकानांसमोर नागरिकांची गर्दी दिसत होती. अखेर पोलीस व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी नागरिकांना हुसकावून लावले. गर्दीमुळे मास्क व सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरश: फज्जा उडाला होता.
फोटो - १४ तारळे
कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कसबा तारळे बाजारपेठेत नागरिकांनी खरेदीसाठी केलेली गर्दी.