कसबा बावड्यात सुरू असलेल्या या निकृष्ट दर्जाच्या कामाची गंभीर दखल आमदार ऋतुराज पाटील यांनीही घेतली. त्यांनीही संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराला याबाबत कडक शब्दांत सुनावले. शहरात २५ कोटी रुपये खर्चून रस्ते बांधण्याचे काम सुरू आहे. या कामावर लक्ष ठेवण्यास महापालिकेची यंत्रणा कमी पडत आहे. निविदेत ठरल्याप्रमाणे दोन-तीन प्रकारचे स्तर टाकून रस्तेबांधणी न करता घाईगडबडीत एकच स्तर टाकून रस्त्याचे काम उरकणे सुरू आहे. कसबा बावड्यातील पाडळकर कॉलनी येथेही अशाच पद्धतीचे निकृष्ट दर्जाचे काम सुरू होते. महापालिकेने याची गंभीर दखल घेतली नाही. त्यामुळेच ठेकेदाराने आठ दिवसात शेजारी कॉलनीत तसाच प्रकार केला. महापालिकेची निवडणूक जवळ आल्याने रस्ते चकचकीत करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, कोट्यवधी रुपयांचा निधी व्यवस्थित खर्च व्हावा, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. रस्ते बांधण्याच्या कामावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवून काम दर्जेदार व्हावे. तसेच आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दर्जेदार कामासाठी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
फोटो : ०६ कसबा बावडा रस्ता
कसबा बावडा येथील दत्त कॉलनीतील निकृष्ट दर्जाचे रस्ते बांधणीचे काम संतप्त नागरिकांनी बंद पाडले.