जयसिंगपूर : किराणा,भाजीपाला आणायला चाललोय, अशी कारणे सांगून नागरिक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासन हतबल झाले आहे. विनाकारण फिरणाऱ्यांचा मुक्त संचार सुरूच राहिल्याने संचारबंदीचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे आता कठोर कारवाईची गरज आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता १५ एप्रिलपासून संचारबंदी केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून उपाययोजना राबविल्या जात आहेत. नगरपालिका, ग्रामपंचायत प्रशासन नागरिकांना सूचना करीत आहेत. संचारबंदीच्या शुक्रवारी दुसऱ्या दिवशी जयसिंगपूर शहरासह ग्रामीण भागात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कायम होती. कोरोनाच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनावर अधिक ताण वाढला आहे. विनाकारण गर्दी करू नये, असे प्रशासन वारंवार सांगत आहे. मेडिकलमध्ये औषध आणायला चाललोय, किराणा आणायला चाललोय, अशी अनेक कारणे सांगून नागरिक मुक्तसंचार करीत आहेत. ये-जा करणाऱ्यांना पोलीस विचारणा करीत आहेत. कारवाईचा बडगा देखील उगारला जात आहे. तरीही रस्त्यावर विनाकारण फिरणारी वाहने दिसत आहेत. त्यामुळे संचारबंदी केवळ नावालाच, जीवनाश्यक वस्तू घेण्याच्या नावाखाली कोरोना नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांसाठी हा विषय डोकेदुखी ठरला आहे.
-
-
चौकट - प्रांताधिकाऱ्यांकडून सूचना शिरोळ तालुक्यातील ५२ ग्रामस्तरीय समित्या, तीन नगरपालिका अंतर्गत प्रभागस्तरीय समित्या व पदाधिकारी, नगराध्यक्ष, पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक यांची प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे बैठक घेतली. यावेळी कोरोनाच्या अनुषंगाने लसीकरण, कन्टोनमेंट झोन , पॉझिटिव्ह रुग्णांची वैद्यकीय तपासणी, संबंधितांची होम आयसोलेशनमधील काळजी, संस्थात्मक अलगीकरण, अत्यावश्यक सेवा याबाबत आवश्यक ती तपासणी व दंडात्मक कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या.