शिरोळ : लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने लसीकरण केंद्रावर नागरिकांची पहाटेपासूनच गर्दी होत असल्याचे चित्र पहावयास मिळते. दरम्यान, शासनाच्या सूचनेनुसार पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांचे लसीकरण सध्या सुरु आहे. त्यातच दुसरे डोसचे अंतर किती याबाबत अजूनही संभ्रम असल्याने सोमवारी शिरोळमध्ये लसीकरण केंद्रावर कर्मचाऱ्यांना नागरिकांची प्रतीक्षा करावी लागली.
लसीकरणासाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असला तरी लोकसंख्या लाखात आणि लसी हजारात अशीच परिस्थिती सध्या आहे. पहाटेपासूनच केंद्रावर लसीकरणाचे टोकन मिळावे, यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याने आरोग्य विभागावर ताण पडत आहे. सुरुवातीला पहिला व दुसऱ्या डोस मधील अंतर ४५ दिवसाचे होते. ते आता ८४ दिवसाचे करण्यात आले आहे. त्यामुळे सुरुवातीला पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची सोय व्हावी, यासाठी दुसऱ्या डोसची सुविधा केंद्रावर केली जात आहे. सोमवारी शिरोळमध्ये १३० डोस उपलब्ध झाले होते. मात्र, ८४ दिवसाच्या अंतरानुसार १६३ जणांची यादी पुढे आली. दुपारपर्यंत यातील केवळ नऊ जणांनीच लस घेतली. त्यामुळे मोबाईलवरून संबंधित नागरिकांशी कर्मचारी संपर्क साधून लसीकरणासाठी जागरुक करत होते.
फोटो - २४०५२०२१-जेएवाय-०६
फोटो ओळ - शिरोळ येथे लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी नागरिक न आल्याने खुर्च्या रिकाम्या होत्या. तर केंद्रामध्ये कर्मचारी नागरिकांच्या प्रतीक्षेत होते. (छाया-सुभाष गुरव, शिरोळ)