नवे पारगाव : निलेवाडी, जुने पारगाव, जुने चावरे व घुणकीच्या गावकऱ्यांचे गुरुवारी रात्रीपासून स्थलांतर सुरू आहे. निलेवाडी गावाला महापुराचा वेढा पडला असून संपर्क तुटला आहे. आज शुक्रवारी सायंकाळी सन २०१९ च्या महापुरापेक्षा तीन फुटाने पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. महापुराच्या संकटात वारणा काठच्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन आमदार राजूबाबा आवळे यांनी केले आहे. घुणकीच्या २५ टक्के लोकांनी स्थलांतर केले आहे.
निलेवाडीच्या १६७८ लोकसंख्येपैकी चौदाशे लोकांचे स्थलांतर झाले आहे. जनावरांच्या काळजीपोटी अद्याप दोनशे लोक गावात अडकले आहेत. दोन बोटीतून गावकऱ्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांना संपर्क करून आणखी एक बोट निलेवाडीसाठी मागवली असल्याची माहिती आमदार राजू बाबा आवळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
आज शुक्रवारी दुपारी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये स्थानिक आमदार राजू बाबा आवळे, तहसीलदार प्रदीप उबाळे, गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी, मंडल अधिकारी अनिता खाडे, पंचायत समिती विस्तार अधिकारी संतोष पवार, सचिन चव्हाण, रमेश पाटोळे यांच्यासह लोकप्रतिनिधी यांनी सहभाग घेतला.
फोटो ओळी:
1. निलेवाडी, तालुका हातकणंगले येथील वारणा नदीवर रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्या आमदार राजू बाबा आवळे (छाया : दिलीप चरणे)