कोल्हापूर : पंचगंगा नदीची पाणीपातळी ३९ फूट (इशारा पातळी) झाल्यावर प्रशासनाकडून नागरिकांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी गुरुवारी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पूर व पूरपरिस्थितीबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा आणि पडणारा पाऊस यांबाबत आढावा घेण्यात आला.मंत्री पाटील म्हणाले, पंचगंगेच्या ३९ फुटांवर पाणीपातळी गेल्यानंतर नागरिकांचे स्थलांतर सुरू करावे. जनावरांसाठी नागरिक मागे थांबतात; त्यामुळे सर्वांत आधी जनावरांना बाहेर काढण्यात यावे. याबाबत एसओपी तयार करावी. जेसीबी, पोकलॅन आणि जनरेटर यँची यादी तालुकानिहाय तयार ठेवावी. ते चालवणारे चालक यांचीही यादी आणि संपर्क क्रमांक तयार ठेवावेत. आंबेवाडी, चिखली या गावांमध्ये आधीच जेसीबी ठेवता येईल का, याबाबतही नियोजन करावे. नागरिकांनीही प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे,ते म्हणाले, गेल्या १५ ते २० वर्षांत पडलेल्या पावसाची आणि धरणांतील पाणीसाठा यांच्या सरासरीबाबत एक आराखडा तयार करावा. त्यानुसार १ जुलै रोजी जिल्ह्यातील धरणांमध्ये काय स्थिती असेल, याची माहिती देऊन पाणीविसर्गाबाबत नियोजन करावे. प्रत्येक धरणाच्या ठिकाणी बेस स्टेशन बसवून संदेशवहनासाठी वॉकीटॉकीचे, पोलीस विभागाचे स्टॅटिक वापरून समांतर संदेशवहन यंत्रणाही माहिती देण्यासाठी उभी करावी. विजेच्या तारा कोठून गेल्या आहेत, कोठे ट्रान्स्फार्मर्स आहेत याची माहिती मॅप मार्कर ॲपच्या माध्यमातून अपलोड करण्यात येत आहे. या माहितीमुळे आपत्ती व्यवस्थापनात बोटी घेऊन जात असताना सुलभतेने मदत होणार आहे.आवश्यक ठिकाणी ७५ ट्रान्स्फॉर्मर्सह्यमहावितरणह्णला दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यात ठिकठिकाणी ७५ ट्रान्स्फॉर्मर्स ठेवण्यात आले आहेत. खांब पडला तर अडचण येऊ नये यासाठी दोन हजार विजेचे खांब विकत घेतले असून तीन दिवसांत त्या तालुक्यांमध्ये ते पोहोच होतील. कर्मचाऱ्यांसाठी ५० लाईफ जॅकेट विकत घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.२५ नव्या बोटींची खरेदीआपत्ती व्यवस्थापनकडे सध्या २० बोटी कार्यान्वित असून आणखी २५ नव्या बोटींची खरेदी करण्यात आली आहे. आठवडाभरात त्यांपैकी १० ते १५ बोटी उपलब्ध होतील. याशिवाय महापालिकेच्या ११ बोटी व जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांनी किमान दोन बोटी देण्याचे सांगितले आहे. महापालिका आयुक्तांनीही जिल्ह्यातील २५ ते २९ कमी आणि जास्त बाधित प्रभागांचा आढावा दिला आहे. शिंगणापूर पाणी योजना ही कमाल पाणी पातळीत कशी चालू ठेवता येईल, याबाबतही उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, पावसामुळे रस्ते बंद होतात त्याची माहिती तत्काळ कशी घेता येईल याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने मोबाईल ॲप तयार करावे. शिरोळ तालुक्यात जागेची पाहणी करून हेलिपॅड तयार करावे.पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे यांनी धरणांची माहिती दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, ह्यमहावितरणह्णचे कार्यकारी अभियंता सागर मारूलकर यांनी तयारीबाबत माहिती दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, प्रांताधिकारी वैभव नावडकर, पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ उपस्थित होते.तीन महिन्यांचे धान्य केले पोहोचजिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी शाहूवाडीतील चार, गगनबावड्यातील एक, राधानगरीतील १३, आजऱ्यामधील दोन आणि हातकणंगलेतील एक अशा २१ गावांत पुढील तीन महिन्यांचे धान्य पोहोचविल्याची माहिती दिली.