कोल्हापूर : केंद्र सरकारने संमत केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय नागरिकत्व नोंद हे दोन्ही कायदे भारतीय राज्यघटनेचे उल्लंघन करणारे आहेत. यातून जातीय व धार्मिक तेढ निर्माण करण्याचा घाट घातला जात आहे. त्याच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चासह विविध संघटनांतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.या दोन्ही कायद्यांविरोधात संघटनांच्या प्रतिनिधींनी तीव्र भावना व्यक्त केल्या. हे कायदे लादणाऱ्या केंद्रातील भाजपप्रणित सरकारवर सडकून टीका करण्यात आली. सकाळी ११ ते दुपारी चार या वेळेत हे आंदोलन करण्यात आले. यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, हे दोन्ही कायदे राज्यघटना कलम १४ चे उल्लंघन करणारे आहेत. देशात दुफळी निर्माण करण्यासाठी तसेच जातीय व धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी भाजप सरकारकडून जाणीवपूर्वक असा घाट घातला जात आहे. मुसलमान विदेशी आहेत, आतंकवादी आहेत, घुसखोर आहेत, अशा पद्धतीने येथील मूलनिवासी मुस्लिमांना बदनाम केले जात आहे.
मुसलमान मूळ भारतीयच असून, त्यांनादेखील या देशात मानसन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. तो अबाधित ठेवण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चा मुस्लिमांबरोबरच संपूर्ण बहुजन समाजाला सोबत घेऊन हक्क, अधिकारांची लढाई लढत आहे. या कायद्यामुळे केवळ मुस्लिमच नाही तर देशातील एस.सी., एस.टी., ओबीसी, भटके विमुक्त, अल्पसंख्याक समाजाचे लोकही अडचणीत येणार आहेत.
देशात अनेक लोक असे आहेत की, ज्यांच्याकडे जातीचा दाखला, जन्माचा दाखला, रेशन कार्ड नाही; त्यांनी नोंद कशी करायची? कुंभमेळ्यात दिसणारे साधू अंगावर फक्त लंगोटा वापरतात. मग त्यांनी स्वत:ची ओळख कशी सिद्ध करायची? असा प्रश्न आहे.आंदोलनात मुफ्ती महंमद फारुख, शाहीद शेख, जदारखान पठाण, कॉम्रेड चंद्रकांत यादव, महेश बावडेकर, प्रमोद हर्षवर्धन, नामदेव गुरव, रूपेश पाटील, सिद्धार्थ नागरत्न, आदींसह विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.तीन टप्प्यांत आंदोलनया दोन्ही कायद्यांविरोधात बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून तीन टप्प्यांत आंदोलन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी धरणे आंदोलन, जिल्हास्तरावर ८ जानेवारी २०२० ला रॅली व २९ जानेवारीला संपूर्ण ‘भारत बंद’चे नियोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील ५५० जिल्ह्यांत एकाच वेळी रस्त्यावर उतरून आंदोलन केले जात आहे.या संघटनांचा सहभागमजलिश-ए-शुरा, उलमा-ए-शहर कोल्हापूर, भारत मुक्ती मोर्चा, जमियत-ए-उलेमा शहर व जिल्हा कोल्हापूर, भारतीय विद्यार्थी युवा, बेरोजगार मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा महिला संघ, कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटी, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, राष्ट्रीय लिंगायत मोर्चा, राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चा, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, एम. आय. ए., हिंदी है हम... हिंदोस्तॉँ हमारा..., जमियत-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्र भटके-विमुक्त समाज, वंचित बहुजन आघाडी, इमदाद फौंडेशन, अहले हदीस जमात, आदी.