कोल्हापूर : वीकेंड लॉकडाऊननंतर सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी शहर गर्दीने फुलून गेले होते. लक्ष्मीपुुरी, राजारामपुरी, महाद्वार रोड, ताराबाई रोड, अंबाबाई मंदिर परिसरात विविध वस्तूंच्या खरेदीसाठी झुंबड उडाली होती. दुपारी एकपर्यंत शहरातील प्रमुख चौकांत आणि रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत राहिली.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सरकारने वीकेंडला म्हणजे शनिवारी, रविवारी लॉकडाऊन कायम राखला. इतर दिवशी सोमवार ते शुक्रवारी सकाळी सात ते सायंकाळी चारपर्यंत अत्यावश्यक सेवा आणि वस्तू विक्रीची दुकाने सुरू करण्यास मुभा आहे. दोन दिवसांच्या निर्बंधानंतर शहरातील अनेक दुकाने सोमवारी सकाळी सात वाजता चालू झाली. सकाळी दहानंतर बाजारपेठेत गर्दीला सुरुवात झाली. ती दुपारी एकपर्यंत राहिली. बिंदू चौक परिसर, लक्ष्मीपुरी बकरी बाजार, भाजी मंडई, पापाची तिकटी, शिवाजी चौक, ताराबाई रोड, गांधीनगरमध्ये खरेदीची झुंबड उडाली होती.
दुचाकी, चारचाकी घेऊन अनेकजण खरेदीसाठी घराबाहेर पडताना दिसत होते. लक्ष्मीपुरीतील भाजी आणि फळ मार्केटमध्ये अक्षरश: झुंबड उडाली होती. येथे काही काळ सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचे चित्र होते. वाहतूक आणि महापालिकेचे कर्मचारी येथे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करीत होते. पण दुपारी एकपर्यंत गर्दी कायम राहिली. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांसमोरही गर्दी झाली होती. ज्येष्ठ नागरिक पेन्शन व इतर कामांसाठी मोठ्या संख्येने आले होते. त्यांच्यासाठी काही बँकांनी दारात मंडप उभारून खुर्चीची व्यवस्था केली होती. तरीही बँकांसमोर अभ्यागतांची आणि ज्येष्ठ नागरिकांची रांग लागलेल्या दिसत होते.
चौकट
शासकीय कार्यालयांतही वर्दळ
लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्याने दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका, जिल्हा परिषद, करवीर पंचायत समिती, करवीर तहसील कार्यालयात अभ्यागतांची वर्दळ वाढली होती. विविध कामांसाठी आणि दाखल्यांसाठी लोक आले होते. जिल्हा परिषदमध्ये सदस्य, त्यांचे समर्थक, कार्यकर्ते, ठेकेदार आले होते.
चौकट
पावसाळी साहित्य खरेदीसाठी
बिंदू चौक, शिवाजी चौक, राजारामपुरी परिसरातील दुकानात पावसाळी साहित्य खरेदी करताना अनेकजण दिसत होते. रेनकोट, छत्री, ताडपत्री खरेदी करीत होते. दुचाकीच्या सीटला प्लास्टिकचे कव्हर बसवून घेण्यातही अनेकजण व्यस्त होते.
दुपारनंतर गर्दी कमी
सकाळी आठ ते दुपारी एकपर्यंत शहरातील बाजारपेठेत गर्दी राहिली. दुपारी तीननंतर मात्र गर्दी ओसरली. अनेक ठिकाणी विक्रेते ग्राहकांची प्रतीक्षा करीत बसले होते. अत्यावश्यक सेवा, वस्तूंची वगळता इतर वस्तूंची दुकानेही, दुचाकी, चारचाकी दुरुस्तीची दुकाने अनेक ठिकाणी सुरू असल्याचे दिसत होते.
कोट
सर्व दुकाने सरसकट सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी आमची मागणी कायम आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करीत सर्वच दुकानदार व्यवसाय करू इच्छितात. त्यांना सरकार आणि प्रशासनाने परवानगी द्यावी.
-संजय शेटे, अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्स
फोटो : १४०६२०२१-कोल- ताराबाई रोड
कोल्हापुरातील ताराबाई रोडवरील बाजारपेठेत विविध वस्तूं खरेदीसाठी अशी गर्दी झाली होती.
फोटो : नसीर अत्तार
फोटो : १४०६२०२१-कोल- महाव्दार रोड
कोल्हापुरातील महाद्वार रोड परिसरात अशी गर्दी झाली होती.
फोटो : नसीर अत्तार
फोटो : १४०६२०२१-कोल- बिंदू चौक
कोल्हापुरातील बिंदू चौक परिसरात अशी वाहतुकीची कोंडी झाली होती.
फोटो : नसीर अत्तार