इचलकरंजी :
नगरपालिकेने गेल्या नऊ महिन्यांपासून शहरातील स्ट्रीट लाईट (सार्वजनिक दिवाबत्ती) चे काम पाहणाऱ्या खासगी कंपनीचे बिल (देयके) अदा केले नाही. परिणामी या कंपनीकडून स्ट्रीट लाईट बंद केली जात असल्याने शहरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे पालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. येत्या काही दिवसांत सणवार असल्याने पालिकेने यातून मार्ग काढावा व शहरामधील दिवाबत्ती नियमित चालू करावी, अशी मागणी नगरसेवक शशांक बावचकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
पत्रकात, इचलकरंजी शहरांतर्गत एलईडी स्ट्रीट लाईटचे व्यवस्थापन केंद्र सरकारने सुचवलेल्या एका खासगी कंपनीकडे दिले असून, शहरात १३६८२ बल्ब लावले आहेत. यामुळे २ वर्षांपासून पालिकेच्या वीज बिलामध्ये अंदाजे ४० टक्के रकमेची बचत होत आहे. वीज बिल वेळेवर अदा केल्यास सूट मिळणार आहे व वेळेवर न अदा केल्यास त्यावर दंडांची आकारणी केली जाणार आहे. असे असताना पालिकेने निधीअभावी नऊ महिने कंपनीचे एक कोटी ३६ लाखाचे बिल थकवले आहे. प्रत्यक्षात मार्च २०२१ अखेर देयके अदा करताना दिवाबत्ती ही अत्यावश्यक बाब असताना कंपनीचे देयक प्रलंबित ठेवले गेले व काही खास ठेकेदारांच्या कोट्यवधी रुपयांची देयके खास कारणासाठी कारभाऱ्यांनी व तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी अदा केली.
केंद्रातील भाजप सरकारचे या कंपनीशी जवळचे संबंध असल्याने पालिकेचा कोणताही विचार न करता कंपनीच्या हिताचा केला गेला. त्याचेच परिणाम आज इचलकरंजीस भोगावे लागत आहेत. शहरामधील दिवाबत्ती नियमित चालू कराव्यात, अन्यथा शहरातील अंधारामुळे चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. याची संपूर्ण जबाबदारी पालिकेची राहील, असे म्हटले आहे.