शहरात आषाढी एकादशी उत्साहात भक्तिमय वातावरण : मंदिरांमध्ये भजन, कीर्तन, अभिषेक, प्रसादाचे आयोजन कोल्हापूर : ‘सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयी माझ्या आणिक काही इच्छा नाही आता चाड तुझे नाम गोड पांडुरंगा...’ अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या विठ्ठलाच्या भक्तीत कोल्हापूरवासीय दंग झाले. अभिषेक, महापूजा, कीर्तन, सत्संग, भजन, प्रसाद, अशा विविध धार्मिक कार्यांनी मंगलमयी वातावरणात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथील पुरातन विठ्ठल मंदिरात पहाटे काकड आरती झाली. त्यानंतर श्री विठ्ठलाच्या मूर्तीस अभिषेक महापूजा करण्यात आली. त्यानंतर विठ्ठलाची सालंकृत पूजा बांधण्यात आली. साडेसातनंतर मूर्ती दर्शनासाठी खुली करण्यात आली. यानिमित्त दिवसभर मंदिरात शहरातील विविध महिला भजनी मंडळांच्यावतीने भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रात्री वाठारकर बुवा यांचे कीर्तन झाले. पुजारी मोहन जोशी, सचिन जोशी, अतुल जोशी, शुभम जोशी, वेणुगोपाल जोशी, मंदार जोशी यांनी पूजाविधी केले. विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी साडेबाराच्या दरम्यान दर्शन रांग मिरजकर तिकटीच्या मुख्य रस्त्यापर्यंत आली होती. श्रीराम फौंड्री तसेच विविध मंडळांच्यावतीने भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. कैलासगडची स्वारी मंदिरात शिवरूपात विठ्ठलाची महापूजा करण्यात आली. सात फूट उंचीची ही मूर्ती म्हणजे भगवान शंकराच्या रूपात पांडुरंगाची पूजा बांधली असून, मूर्तीवर गंगाजलाचा अभिषेक करण्यात आला. धार्मिक विधीने मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
शहरात आषाढी एकादशी उत्साहात
By admin | Published: July 16, 2016 12:04 AM