कोल्हापूर : नगररचना कार्यालयात नागरिकांनी किती फेऱ्या मारायच्या, असा सवाल करत कामकाज सुधारा अन्यथा आम्हालाच नगररचना कार्यालयात येऊन बसावे लागेल, असा गर्भित इशारा गुरुवारी स्थायी समितीने प्रशासनाला दिला. या कार्यालयात केवळ पैसेवाल्यांचीच कामे होतात, असा थेट आरोपही यावेळी करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती शारंगधर देशमुख होते.नगररचना कार्यालयाबाबत तक्रारी वाढत आहेत. नागरिकांना नुसत्या फेऱ्या मारायला लावल्या जातात. अधिकारी भेटत नाहीत, भेटले तरी पैसेवाल्यांसाठी काम करतात, असा आरोप सदस्यांनी केला. एक नागरिक सायकलवरून उदबत्ती विकून पोट भरतो. या नागरिकाने दोन खोल्यांचे घर बांधले असून, तो गेले सहा महिने कार्यालयात भोगवटा प्रमाणपत्रासाठी फेऱ्या मारत आहे. त्याला रोज कर्मचाऱ्याकडून आॅफिसवर बसविले जाते. हातावरीचे पोट असणाऱ्या माणसांनी किती फेऱ्या मारायला लावायच्या, अशी विचारणा सभापती देशमुख यांनी केली.जुनी मोरे कॉलनी येथील लेआऊट बाबत वारंवार प्रश्न विचारले असता, पुढील मिटिंगपर्यंत कार्यवाही करतो, अशी उत्तरे दिली जातात. प्रत्येक मिटिंगला वेगवेगळे अधिकारी उपस्थित असतात. कारवाई करा, अन्यथा पुन्हा नगररचना कार्यालयास टाळे घालणार, असा इशारा दीपा मगदूम यांनी दिला. विकास परवानगी प्रकरणी नगररचना विभागाकडून शनिवारी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे, त्यामध्ये प्रलंबित कामांची पूर्तता केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरात टिप्पर आल्यानंतर कंटेनरमुक्त करायचे धोरण होते, त्याचे काय झाले, अशी विचारणा करतानाच एका टिप्परने नागरिकांची गैरसोय होत आहे. कंटेनर जागेवर नाहीत. नागरिक रस्त्यावर कचरा टाकतात, याकडे पूजा नाईकनवरे यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यावेळी झालेल्या चर्चेत माधुरी लाड, प्रतिज्ञा उत्तुरे यांनीही भाग घेतला.