भारत चव्हाण
कोल्हापूर : शहराच्या उत्तरेकडून वाहणारी पंचगंगा नदी आणि तिची पूररेषा, तर दक्षिणेकडील भागाला खेटून असलेली खेडी यामुळे शहरात नवीन गृह प्रकल्प उभारणीवर कमालीच्या मर्यादा आल्या आहेत. शहराची होत असलेली कोंडी हद्दवाढीमुळे फुटेल, असे दिसत असताना आता त्यालाही खीळ बसली आहे. त्यामुळे भविष्यकाळात नागरिकांना जागा व नवीन घर घेणे अडचणीचे ठरणार आहे.
कोल्हापूर शहराचे क्षेत्रफल ६६.८२ किलोमीटर इतके मर्यादित आहे. शहराची लोकसंख्या, नागरी वस्ती मात्र झपाट्याने वाढली. १९७१ साली झालेल्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या २ लाख २९ हजार ०५० एवढी होती, ती २०११ च्या जनगणनेनुसार ५ लाख ४९ हजार २३६ इतकी झाली. तर २०२१ पर्यंत ती आणखी वाढून साडेसहा लाखांच्या घरात पोहोचली आहे. गेल्या पन्नास वर्षांत चार लाखांनी लोखसंख्या वाढली, पण शहराचे क्षेत्रफळ वाढलेले नाही. त्यामुळे उपलब्ध जागेवरच शहरातील नागरिक दाटीवाटीने वसले आहेत.
पश्चिमेकडून वाहणारी पंचगंगा नदी आणि तिला आलेल्या तीन मोठ्या महापुरांमुळे नदीची पूररेषा चर्चेत आली. सध्या नदीच्या पूररेषेवर काम सुरू आहे. परंतु ती अंतीम झालेली नाही. मात्र, मागच्या दोन वर्षांत ज्या ज्या भागात महापुराचे पाणी आले होते, त्या त्या ठिकाणी नवीन बांधकामे अडचणीत आली आहेत. एक तर आहेत त्याच गृह प्रकल्पांना ग्राहक मिळेनात आणि नवीनही प्रकल्प उभारता येईनात.
शहराच्या ६६.८२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळापैकी नदी आणि पूररेषेतील सुमारे १५ चौरस किलोमीटर क्षेत्रफळातील विकास आता जवळपास ठप्प झाला आहे. उर्वरित ५० ते ५२ चौरस किलोमीटरमध्ये खेळाची मैदाने, बगीचा, खुल्या जागा, तलाव, नाले व त्याचे झोन, आरक्षणातील जागा याशिवाय शहरात शेती महामंडळाची आरक्षित जागा, शिवाजी विद्यापीठ परिसर, कळंबा कारागृह आणि त्याचे निर्बंध यामुळे शहरात विस्ताराला संधीच उरलेली नाही.
- घर घेणे होणार महाग
एकीकडे पंचगंगा नदीकाठ व पूरक्षेत्रामुळे आलेल्या मर्यादा आणि दुसरीकडे शहराच्या पूर्व तसेच दक्षिण भागात वाढलेली नागरी वस्ती यामुळे जागा मिळविताना अडचणी येत आहेत. जागा मिळालीच तर त्याचे दर भरमसाठ आहेत. सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहेत. त्यामुळे भविष्यकाळात घरांच्या किमती वाढलेल्या पाहायला मिळतील.
-हद्दवाढ हाच पर्याय
शहराची वाढत्या लोकसंख्येमुळे तसेच घरांच्या गर्दीमुळे भलतीच कोंडी झाली आहे. ही कोंडी फोडायची असेल तर त्यावर एकच पर्याय म्हणजे शहराच्या हद्दवाढीचा आहे. म्हणूनच हद्दवाढ ही केवळ राजकीय मागणीच नाही तर ती भौगाेलिक गरज बनली आहे.
- लोकसंख्येच्या घनतने मर्यादा आलंडली
एका सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार १९९१ मध्ये शहरातील लोकसंख्येची दर चौरस किलोमीटरमागे ६०८२ इतकी होती. ती २०११ मध्ये ८९२० इतकी झाली. गेल्या दहा वर्षांत ती आणखी वाढली आहे. ही मर्यादा केंव्हाच ओलंडली आहे.