कोल्हापूर : येथील शहर अन्नधान्य पुरवठा विभागाने शाहू मार्केट यार्डाच्या परिसरात कर्नाटकातील हुक्केरी येथून आलेला सुमारे २१ टन तांदूळ असलेला ट्रक बुधवारी सकाळी पकडला. हा रेशनचा तांदूळ असून तो विक्रीसाठी या ठिकाणी आणला असल्याची माहिती सकृतदर्शनी मिळाली आहे. याबाबत लक्ष्मीपुरीतील व्यापारी रामवीर शर्मा यांच्याविरोधात शाहूपुरी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. या तांदळाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती शहर अन्नधान्य पुरवठा अधिकारी माधवी शिंदे यांनी दिली.
हुक्केरीहून तांदळाचा ट्रक शाहू मार्केट यार्ड परिसरात आला असल्याची माहिती शहर पुरवठा विभागाला मिळाली. त्यानुसार या विभागाचे अधिकारी, निरीक्षकांनी त्या ठिकाणी जाऊन हा ट्रक पकडला. त्यात २५ किलोंची ८६० पोती आढळून आली. सुमारे २१ टन हा तांदूळ आहे. रेशनवर वितरित केला जाणारा ‘परिमल’ हा तांदूळ असल्याची सकृतदर्शनी माहिती मिळाली आहे. त्याबाबत हुक्केरीतील रवी ट्रेडर्सशी संपर्क साधला असता, त्यांनी हा ‘परिमल’ तांदूळ असल्याचे सांगण्यात आले.
या तांदळाचे नमुने तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्याच्या अहवालानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे शहर अन्नधान्य पुरवठा अधिकारी माधवी शिंदे यांनी सांगितले. शिंदे यांच्यासह पुरवठा निरीक्षक सुरेश टिपुगडे, काशीनाथ पालकर, बबन घोडके, संजय गीते, सतीश शिंदे यांनी तांदूळ पकडण्याची कारवाई केली.
कोल्हापुरातील शहर अन्नधान्य पुरवठा विभागाने बुधवारी सकाळी शाहू मार्केट यार्ड परिसरात कर्नाटकातून आलेला तांदळाचा ट्रक पकडला.