जोतिबा डोंगराभोवतालची बारा ज्योतिर्लिंगे व अष्टतीर्थ यांच्या दर्शनासाठी भाविक प्रदक्षिणेत सहभागी होतात.
जोतिबा डोंगरासभोवती ३० कि.मी.चा अनवाणी जमिनीवर खाली न बसता ही दिंडी पूर्ण केली जाते. सोमवारी सकाळी मंदिरात धार्मिक विधी झाला. श्रींचे दर्शन घेतल्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत दिंडी निघाली. दिंडी मुख्य मंदिरातूत दक्षिण दरवाजातून गजगतीने मार्गस्थ झाली. अग्रभागी वीणाधारी गजानन डवरी सोबत पताका होता. सकाळी दहा वाजता दिंडी गायमुख तलाव येथे आली. तेथील श्रीशैल मल्लिकार्जुन मंदिरात धार्मिक विधी झाला. दिंडी पुन्हा मार्गस्थ झाली. साडेअकरा वाजता दिंडी जोतिबा धडस खळा येथे आली. तेथून ती नंदीवन, आंबावन, नागझरी, व्याघजाई तीर्थ, तसेच अष्टतीर्थाचे दर्शन घेऊन दिंडी मुरगुळा येथे आली. दिंडी पुन्हा दानेवाडी मार्गे सारकाळ येथे दिंडी आली. गिरोली (ता. पन्हाळा) येथे आली. तेथील श्री निनाई मंदिरात विविध धार्मिक विधी व आरती झाली. येथेच एका दगडावर सातार्डेकर शिवारामध्ये बारा ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती कोरल्या आहेत. तेथे आरती करून दर्शन घेतले. पुन्हा गायमुख येथे आली. तेथून जोतिबा मंदिरमार्गे पुन्हा श्री मूळमाया यमाई मंदिरात सांय ५.३० वाजता नगर दिंडी आली. सुंठवडा वाटपाने नगरप्रदक्षिणेची सांगता झाली. पोलीस बंदोबस्त तैनात होता. जोतिबा डोंगरवर भाविकांना प्रवेश बंदी केली होती. दुसऱ्या वर्षीही नगर दिंडी भाविकाविना झाल्यामुळे व्यापारी वर्गाला मोठा आर्थिक फटका बसला.
फोटो कॅप्सन : १) श्रावणातील तिसऱ्या सोमवारनिमित्त निघालेली जोतिबा डोंगरची नगरप्रदक्षिणा.