लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शहरात घरफोड्या, चोऱ्या, लूटमारी, खून, आदी गंभीर गुन्हे घडत आहेत. संपूर्ण शहर असुरक्षित बनले आहे. तुम्ही करताय काय? स्वत:चे हित जपण्यापेक्षा गुन्हे रोखा, अन्यथा मुख्यालयात येऊन बसा, अशा कडक शब्दांत शहरातील चारीही पोलीस ठाण्यांच्या गुन्हे शाखेच्या (डिटेक्शन ब्रँच - डीबी पथक) कर्मचाऱ्यांची कानउघाडणी पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी शुक्रवारी केली. शहरात राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा या चार पोलीस ठाण्यांच्या ठिकाणी खून, घरफोडी, चोऱ्या, लूटमारीसारखे गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्वतंत्र गुन्हे शाखा आहे. या विभागातील कर्मचाऱ्यांना मरगळ आली आहे. त्याचा परिणाम म्हणून शहरात गंभीर गुन्ह्यात वाढ होत आहे. रात्रीच्या गस्तीवेळी पोलिसांच्या बेपर्वाईमुळे नागरिकांची झोप उडाली आहे. गेल्या दोन महिन्यांत घरफोडी आणि चेन स्नॅचिंगच्या गंभीर घटनांनी कळस गाठला आहे. दिवसाही घरफोडी, लूटमार घटना घडू लागल्याने सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये भरदिवसा सहा फ्लॅट फोडून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक मोहिते यांनी चारीही पोलीस ठाण्यांच्या निरीक्षकांसह गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना चांगलेच फटकारले. तुम्हाला काम जमत नसेल तर मुख्यालयात येऊन बसा, अशा कडक सूचना यावेळी मोहिते यांनी दिल्या. बैठकीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, निरीक्षक तानाजी सावंत (लक्ष्मीपुरी), प्रवीण चौगुले (शाहूपुरी), दिनकर मोहिते (क्राइम ब्रँच), संजय साळुंखे (राजारामपुरी), निशिकांत भुजबळ (जुना राजवाडा), आदी उपस्थित होते.
शहर असुरक्षित, तुम्ही करताय काय?
By admin | Published: May 27, 2017 12:25 AM