कोल्हापूर : शहरातील विविध ३५ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावी प्रवेशासाठी यावर्षी ऑनलाइन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक बुधवारी जाहीर होणार आहे.
कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेतील अकरावी प्रवेशासाठी कोल्हापूर आणि गडहिंग्लज शहरात केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. शासन आदेशानुसार यंदाही केंद्रीय प्रक्रिया असणार आहे. कोल्हापूर शहरातील ऑनलाइन प्रक्रियेसाठी लागणाऱ्या संगणक प्रणालीबाबतची निविदा केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने प्रसिध्द केली आहे. या निविदाची मुदत मंगळवारी (दि.१७) संपणार आहे. त्यानंतर बुधवारी समितीतील सर्व प्राचार्यांची बैठक होणार आहे. त्यामध्ये प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक निश्चित करून ते जाहीर करण्यात येईल, अशी माहिती या समितीचे सचिव आणि सहाय्यक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांनी शुक्रवारी दिली. दरम्यान, शासकीय आणि खासगी तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक)मधील प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत शुक्रवारी संपली. या मुदतीपर्यंत जिल्ह्यातील तंत्रनिकेतनसाठी एकूण ५३०० विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून त्यापैकी ४३०० जणांनी अर्जांची निश्चिती केली आहे. प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमास अर्ज करण्यास मुदतवाढ मिळण्याची शक्यता नोडल ऑफिसर प्राचार्य प्रशांत पट्टलवार यांनी व्यक्त केली.