गेले चार दिवस मुसळधार पावसाने शहराला महापुराचा विळखा बसला होता. मध्यवस्तीत पुराचे पाणी शिरल्याने बहुतांश घरांत पाणी घुसले, रस्त्यावर पाणी आल्याने रस्ते वाहतुकीला बंद झाले होते.
गेले दोन दिवस पावसाने उघडीप दिल्याने शहरवासीयांना काहीसा दिलासा मिळाला, सूर्यदर्शनही झाले. महापुराचे पाणी संथपणे ओसरू लागले. रविवारी दिवसभरात दसरा चौक टायटन शोरूम ते उमा चित्रमंदिर तसेच सीपीआर ते जुना बुधवारपेठ या दोन रस्त्यावरील पुराचे पाणी ओसरल्याने दोन्हीही रस्ते वाहतुकीस खुले झाले.
दरम्यान, लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर ते व्हीनस कॉर्नर या रस्त्यावरील पाणी ओसरले असले तरीही रस्त्यावर गाळ, दलदल मोठ्या प्रमाणावर असल्याने तो अद्याप वाहतुकीला खुला केलेला नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत शिरलेले पाणी मागे सरले, तरीही आवारात पुराचे पाणी साचून आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील चौकातील पुराचे पाणी ओसरले, पण तेथून असेब्ली रोड, महावीर महाविद्यालय या मार्गावर पुराचे पाणी अद्याप मोठ्या प्रमाणात आहे. जिल्हाधिकारी कार्यालय ते खानविलकर पेट्रोल पंपपर्यंत महावीर उद्यानसमोरील रस्ताही खुला झाला. पण पुढे जयंती नाल्याचे पाणी रस्त्यावर असल्याने हा रस्ता वाहतुकीला जिल्हाधिकारी कार्यालयानजीकच बंदच आहे.
बंद मार्ग...
शाहुपुरी गवत मंडई ते पार्वती चित्रमंदिर, शाहुपुरी कुंभार गल्ली, शाहुपुरी ३ री गल्ली, कोंडा ओळ ते व्हिनस काॅर्नर, दसरा चाैक ते व्हिनस कॉर्नर, गंगावेश ते शिवाजी पूल, रमनमळा, असेंब्ली रोड, जिल्हाधिकारी कार्यालय ते महावीर महाविद्यालय, दुधाळी मैदान परिसर. जिल्हाधिकारी कार्यालय ते खानविलकर पेट्रोल पंप.
मार्ग सुरू...
लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर ते व्हीनस कॉर्नर, दसरा चौक ते उमा चित्रमंदिर (सुभाष रोड), सीपीआर ते जुना बुधवार पेठ.
घरे, दुकाने स्वच्छतेची लगबग
शहरातील ज्या भागात पाणी ओसरले, त्या भागात नागरिक पुराच्या पाण्यानेच घरे, दुकाने, व्यवसायाची ठिकाणी स्वच्छता करू लागले आहेत. शाहुपुरी तसेच व्यावसायिकांच्या ठिकाणी शिरलेले पाणी ओसरले, त्या ठिकाणी साचलेला गाळ, दुकानातील पुराच्या पाण्याने खराब झालेले साहित्य, फर्निचर आदी साहित्य बाहेर काढून साफसफाई करण्यात येत असल्याचे चित्र होते. गेले चार दिवस शहराचा पाणीपुरवठा बंद झाल्याने पूर ओसरलेल्या भागातील घरे धुण्याची कामे सहकुटुंब करत येत असल्याचेही चित्र जागोजागी दिसत होते.