शहरातील पाणीपुरवठा ठप्प झाल्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले गेले असले तरी गेले तीन दिवस टँकर दबंग नगरसेवकांच्या ताब्यात आहेत असा आक्षेप नोंदवित अमोल माने, सुहास आजगेकर, सतीश यादव यांनी कळंबा फिल्टर हाऊस येथे अधिकाऱ्याशी वादावादी केली. दबंग नगरसेवक स्वतःच्या प्रभागातच पाणीपुरवठा करत आहेत. ज्या भागातील लोकप्रतिनिधी सौम्य स्वभावाचे आहेत, त्यांना टँकर उपलब्ध होत नाही. शिवीगाळ करणाऱ्यांना टँकर मिळत आहे, पण सौजन्याने टँकर मागणाऱ्यांना तो दिला जात नाही, अशी तक्रारही त्यांनी केली.
दबंग नगरसेवकांच्या प्रभागातच जनता आहे आणि बाकीच्या प्रभागात जनता राहत नाही का, असा सवालही त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. महापालिका प्रशासनाने नियोजन करून टँकर प्रभागनुसार दिले पाहिजेत, अन्यथा सामान्य जनतेच्या असंतोषाचा भडका उडेल आणि याला केवळ महापालिका प्रशासन जबाबदार असेल, असा इशाराही अमोल माने यांनी दिला.